सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सोमवारी अवकाळी पावसामुळे घडलेल्या घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंगबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. याच अनधिकृत होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी जाहिरातदारांकडून पूर्व द्रुतगती मार्गावरील झाडावर विषप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाच्या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी २४ फेब्रुवारी रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. हे होर्डिंग अनधिकृत असून, पालिकेने त्याला परवानगी दिली नव्हती. मात्र, रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळे परवानगी असल्यामुळे हे होर्डिंग उभे करण्यात आले होते.
मुंबईतील प्रदूषण लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी महापालिकेने पूर्व द्रुतगती मार्गावर पेल्टोफोरम, सुबाभूळ, पिंपळ आणि फॉक्स टेल पाम या प्रजातींच्या झाडांची लागवड केली होती. काही दिवसांपूर्वी पालिकेचे अधिकारी घाटकोपर पेट्रोल पंपासमोरील झाडांची पाहणी करीत असताना त्यांना काही झाडे मृतावस्थेत आढळली. पाण्याअभावी किंवा इतर कारणांमुळे झाडे मृत झाली असावीत, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, अचानक ४० ते ५० झाडे पूर्णपणे सुकून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला.
असा केला विषप्रयोग
उद्यान विभागाच्या माहितीनुसार, पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली. शिवाय पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन पूल ते रमाबाई आंबेडकर नगर येथील नाल्यापर्यंत दुभाजकावर असलेल्या २२ फॉक्स टेल पाम प्रजातीच्या झाडांच्या फांद्या तोडून विषप्रयोग केल्याचे निदर्शनास आले.