थंडाव्याच्या शोधात मुक्या प्राण्यांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:27 AM2018-05-04T02:27:20+5:302018-05-04T02:27:20+5:30
शहर व उपनगरातील उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, वाढत्या उष्णतेचा फटका मुक्या पशुपक्ष्यांनाही बसू लागला आहे.
मुंबई : शहर व उपनगरातील उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, वाढत्या उष्णतेचा फटका मुक्या पशुपक्ष्यांनाही बसू लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे थंडाव्याच्या शोधात बहुतेक मुके जीव मानवी वस्तीत धाव घेत असल्याच्या प्रतिक्रिया प्राणिमित्र संघटनांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात आकाशात भरारी घेणारे पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश आहे.
वाढत्या उन्हामुळे पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी एक पाऊ ल पुढे येत प्राणिमित्रांनी मुंबईकरांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यात प्लॅस्टिकची भांडी उन्हाने वितळल्याने पाणी दूषित होते. म्हणून पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याने भरलेली मातीची भांडी ठेवण्याचा सल्ला प्राणिमित्रांनी दिला आहे. एखादा पक्षी उष्माघाताने जमिनीवर कोसळल्यास नागरिकांनी त्याला पकडताना त्याच्यावर एखादे कापड टाकून एका बॉक्समध्ये ठेवण्याचे आवाहन प्लान्ट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी केले. ते म्हणाले, मुंबईकरांनी जखमी प्राण्यांवर माहिती अभावी कोणत्याही प्रकारचे उपचार करू नयेत. याउलट नोंदणीकृत प्राणी संघटनांना बोलावून त्यांच्याकडे ते सुपुर्त करावेत.
मे महिना हा जास्त तापमानाचा असल्याने पशुपक्ष्यांसाठी पाण्यासह धान्याची सोय करण्याची गरज आहे. मे महिन्यात जास्तीतजास्त झाडे लावली पाहिजेत. तरच येणाºया पावसात त्यांना पुरेसे पाणी मिळून शहर व उपनगरांत हिरवळ कायम राहील. तसेच अधिकाधिक पशुपक्ष्यांचा सहवास मुंबईकरांना अनुभवता येईल, अशी माहिती यंग इर्न्व्हामेन्टलिस्ट प्रोग्रामचे संस्थापक एल्सि ग्रेब्रियल यांनी दिली.
साप आणि पक्षी अधिक त्रस्त
‘रॉ’ संस्थेचा अहवालानुसार एप्रिल महिन्यात ३१ पक्षी उष्माघाताने व जखमी स्वरूपात आढळून आले. त्यात घार, घुबड, पोपट, कबुतर, कावळा, सेंट पायपर इत्यादी पक्ष्यांचा समावेश आहे.
तसेच थंडाव्याच्या शोधात बाहेर पडणारे ६० सर्प आढळून आले. यात नाग, धामण, पाणदिवड, सुकई, चापडा इत्यादी सरपटणारे प्राणी होते. प्राण्यांमध्ये माकड, खार, वटवाघुळ व ससा इत्यादी आढळून आले.
तर सर्प (स्पे्रडिंग अवेरनेस आॅन रेप्टाइल अॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम) या संस्थेस एप्रिल महिन्यात उन्हाचा त्रास झाल्याने आणि जखमी अवस्थेतील १०३ सरपटणारे प्राणी, ८ सस्तन प्राणी आणि ५९ पक्षी सापडले.