ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 27 - पोकेमॉन गो गेमविरोधात पोलिसांनी कंबर कसली असताना मुंबईत या गेममुळे पहिल्या अपघाताची नोंद झाली आहे. वांद्रे येथील 26 वर्षीय जब्बीर अली गाडी चालवत असताना 'पोकेमॉन गो' खेळण्यात व्यस्त होते. त्यावेळी रिक्षाला ठोकून त्याच्या गाडीचा अपघात झाला असून गाडीचं नुकसान झालं आहे.
मिडे डे वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कार्टर रोडवरुन बॅण्डस्टँडला जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर जब्बीर अलीला हा खेळ किती धोकादायक ठरु शकतो याची कल्पना आली आहे. त्यामुळेच त्याने या खेळाबद्द्ल लोकांमध्ये जागरुकता आणणार असल्याचं सांगितलं आहे. पोकेमॉन गो मुळे झालेल्या या अपघाताची माहिती लोकांना मिळावी आणि त्यांनी यातून धडा शिकावा यासाठी जब्बीरने गाडीचा फोटो सोशल मिडियावर अपलोड केला आहे.
पोकेमॉन गो गेममुळे अमेरिका, जपानमध्ये अगोदरच अपघातांचे प्रमाण वाढले असताना मुंबईनेही पहिल्या अपघाताची नोंद केली आहे. 'मला ड्रायव्हिंग करायला आवडते आणि मी नेहमी वाहतुकीच्या नियमांचं पालन करतो. मी आणि माझा भाऊ ट्राफिरकमध्ये अडकलो होतो. तो सतत पोकेमॉन खेळत होता. कुतुहूल वाटल्याने मी त्याचा मोबाईल घेऊन गेम समजण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रिक्षाने गाडीला धडक दिली आणि पळून गेला. गाडीच्या बम्परचं नुकसान झालं आहे. पहिल्यांदाच मी हा गेम खेळत होतो आणि मला 15 ते 20 हजारांचं नुकसान झालं', असं जब्बीर अलीने सांगितलं आहे.
पोकेमॉन गेमचा फिव्हर -
पोकेमॉन गो गेम लाँच झाल्यानंतर निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी अगोदरच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सतत मोबाईलमध्ये पाहत गेम खेळताना देहभान विसरणा-या अतिउत्साही लोकांमुळे मुंबईत धोके आणि अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 'पोकेमॉन गो' विरोधात कंबर कसली असून मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीनेच कठोर नियमावली आखण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी यासंबंधी ट्विटरवरुन एक व्हिडिओ देखील जारी केला आहे.