मोहोपाडा : कोन-सावला रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. कोन फाटा ते सोमाटणेपर्यंत रस्ता वाहनचालकांसाठी एक आव्हान ठरत आहे. कोन-सोमाटणे रस्त्यावरील कंटेनर यार्डमुळे या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत ये-जा असते. या अवजड वाहनांमुळेच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कोन-सोमाटणे रस्ता पूर्वी भारत उद्योग लिमिटेड या कंपनीला बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर देण्यात आला होता. त्यावेळी या रस्त्याची नियमित दुरु स्ती होत होती. परंतु आता टोल बंद झाल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून या रस्त्याची निगा राखली जात नसल्याने हा रस्ता दिवसेंदिवस खराब तसेच धोकादायक होत आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच शिवाय वाहनांचेही नुकसान होते. या रस्त्यावरून दुचाकीने प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. रस्त्यामध्ये पडलेले खड्डे व त्यातच भरधाव वेगाने येणारे अवजड कंटेनर. या दोन गोष्टींमुळे दुचाकी चालक बेजार झाले आहेत. या रस्त्यावर कुठेही वाहतूक पोलीस तैनात नसल्याने अवजड वाहनचालकांवर कोणताच अंकुश नाही. ही अवजड वाहने कुठेही पार्क केलेली असतात. त्यामुळे या अवजड वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे. रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असून अधिकाऱ्यांना या रस्त्याबाबत काहीच गांभीर्य नाही, असेच दिसून येत आहे. कोन-सोमाटणे रस्त्यावरूनच रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे घातक रसायनांनी भरलेल्या टँकरची वाहतूक होत असते, या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
कोन-सोमाटणे रस्त्यावर खड्डे
By admin | Published: June 30, 2015 10:25 PM