पोलीस सलग १५ तास रस्त्यावर
By admin | Published: January 4, 2016 02:13 AM2016-01-04T02:13:13+5:302016-01-04T02:13:13+5:30
नवीन वर्षाचे स्वागत उत्साह, जल्लोषात झाले आणि अपघातांमध्ये यंदा लक्षणीय घट झाल्याने नववर्षाचा गोडवा अधिक वाढला.
मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत उत्साह, जल्लोषात झाले आणि अपघातांमध्ये यंदा लक्षणीय घट झाल्याने नववर्षाचा गोडवा अधिक वाढला. याचे श्रेय प्रामुख्याने जाते ते रात्रभर डोळ्यांत तेल घालून पहारा करणाऱ्या मुंबई पोलीस आणि वाहतूक नियंत्रण शाखेला. मुंबईकर जल्लोषात तल्लीन असताना त्यांनी ड्युटी बजावतच नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. रस्ता, चौपाटीवर झालेला बेफाम ट्रॅफिकजाम, बेशिस्त वाहतुकीला दिशा देत आणि ‘तळीरामां’ना आवरतच त्यांनी सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. सुमारे सलग १५ तासांच्या ड्युटीनंतर कामावरून घरी पोहचेपर्यंत दुसऱ्या दिवसाची सकाळ उलटलेली होती. त्यानंतर त्यांनी घरातील मंडळींना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
३१ डिसेंबरला मुंबई शहर व उपनगरात सुमारे ३५ हजारांवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी प्रामुख्याने अतिरेकी हल्ल्याची शक्यता, महिलांची छेडछाड आणि ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ या प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करीत बंदोबस्ताचे नियोजन केले होते. त्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्ट कोणत्याही गोंधळाविना आनंदात साजरा झाला. त्यासाठी दुपारी ३ वाजल्यापासून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तो
१ जानेवारीला पहाट ५पर्यंत कायम होता. त्यानंतर पोलिसांना आपल्या घरी पोहोचेपर्यंत सकाळ उजाडलेली
होती.
वाहतूक पोलीस शिपाई अमित वानेखेडे यांनी सांगितले, मी ३१ डिसेंबरला रात्री गिरगाव चौपाटीला बंदोवस्तासाठी होतो. त्या ठिकाणी खूपच उत्साहात नववर्षाचे स्वागत झाले. रात्री १२च्या सुमारास आणि त्यानंतर येणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आम्हीही त्यांना शुभेच्छा देत होतो. अशा प्रकारे आनंदात आम्हीही नववर्षाचे स्वागत केले.
कर्तव्य बजावत असताना नववर्षाचे स्वागत करणे हेच आमचे सेलिब्रेशन आहे. यात आनंद मिळतो. ३१ डिसेंबरच्या रात्री पवई जंक्शन येथे मी ड्युटीवर होतो. या ठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे विशेष लक्ष देऊन काम करावे लागले. ड्युटी करत असतानाच नववर्षाचे स्वागत केल्याचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रकाश मनसुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कर्तव्य बजावत असताना नववर्षाचे स्वागत करणे हेच आमचे सेलिब्रेशन आहे. यात आनंद मिळतो. ३१ डिसेंबरच्या रात्री पवई जंक्शन येथे मी ड्युटीवर होतो. या ठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे विशेष लक्ष देऊन काम करावे लागले. ड्युटी करत असतानाच नववर्षाचे स्वागत केल्याचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) प्रकाश मनसुख यांनी सांगितले.