मुंबई - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पूर्व भागातील पाणीप्रश्नी शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला म्हणून पोलीस छळ करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी केला आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोमवारी दिल्याचे टाव्हरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टाव्हरे म्हणाले की, पाणीप्रश्नी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जलसंपदा विभागासोबत बैठक झाली होती. मागण्या मान्य केल्याचे आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगितीचे पत्र भोसरी पोलिसांना दिले होते. मात्र त्यादरम्यान पोलीस कर्मचाºयांनी दमदाटीस सुरुवात केली. यासंदर्भात मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. स्वत: गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले.मात्र पाच महिन्यांपर्यंत कोणतीही चौकशी झाली नाहीच, उलट गुंडामार्फत पोलिसांनी प्रकरण मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या. चौकशीचा फार्स म्हणजे भोसरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांनी येथील साहाय्यक आयुक्तांविरोधात केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी बोलावले आहे. एखादा कनिष्ठ अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाºयाची चौकशी काय करणार, असा सवालही टाव्हरे यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणात पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी टाव्हरे यांना समजपत्र धाडले होते. त्यात भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संपत भोसले व उपनिरीक्षक यांच्याविरोधातील तक्रारीच्या चौकशीसाठी टाव्हरे यांना कार्यालयात बोलावले होते.मात्र या पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार केली नसल्याचे टाव्हरे यांनी सांगितले. त्या वेळी चूक कबूल करून सहायक आयुक्तांनी पुन्हा नवीन समजपत्र धाडले. पोलिसांनी केलेल्या आवाहनानुसार चौकशीसाठी हजर झालेल्या टाव्हरे यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचदिवशी संबंधित कर्मचाºयांनी धमक्या दिल्याने पुन्हा टाव्हरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी टाव्हरे यांनी केली आहे.संबंधित प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई आणि पाणी प्रश्न मिटला नाही, तर १५ आॅक्टोबरपासून बेमुदत धरणे आंदोलनासाठी आझाद मैदानात बसणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याचा पोलिसांकडून छळ, अशोक टाव्हरे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:52 AM