लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नवरात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत टवाळखोरी करणाऱ्यावर पोलिसांचा विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे; तसेच साध्या गणवेशातील पोलिस गर्दीत सहभागी होत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. यावेळी महिलांची छेड काढणाऱ्यांविरुद्ध पोलिसांच्या काठीचा प्रसाद खावा लागू शकतो. त्यामुळे कोणी टवाळखोरी केली तर त्यांचे काही खरे नाही.
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये महिला सुरक्षा कक्ष आणि निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, निर्भया पथक सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
नवरात्रीत अंधेरी, गोरेगाव, काळाचौकी, बोरिवली, मुलुंड, घाटकोपर भागात मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन करण्यात येते. यावेळी गर्दीच्या ठिकाणी चोरीसह छेडछाडीच्या घटना घडतात. याचदरम्यान टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी साध्या गणवेशातील महिला पोलिस ठीकठिकाणी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे, चुकून त्यांच्या हाती लागल्यास खैर नाही.
मोबाइल, दागिने सांभाळा गेल्या सात महिन्यांत चोरीच्या ३३५९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १३७७ गुन्ह्यांची उकल झाली. यामध्ये मोबाइल चोरीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. गर्दीच्या ठिकाणी मोबाइल, दागिने सांभाळा असे आवाहन करण्यात येत आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे किमती ऐवजावर हात साफ करताना दिसतात.
क्यूआर कोडचा धाक... मुंबईतल्या महिलांसंबंधित घडलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर निर्जनस्थळी, धोकादायक अशी ठिकाणे निवडून त्या ठिकाणी क्यूआर कोड लावून गस्तीवर भर देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशी ३० ते ४० ठिकाणे असून, त्यानुसार हे पथक साध्या गणवेशात छुप्या कॅमेऱ्यांसह टवाळखोरांवर लक्ष ठेवून राहतात.
येथे करा तक्रार महिलांसाठी पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनसह १०३ क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.