पोलीस आणि नैतिकता
By admin | Published: August 16, 2015 01:52 AM2015-08-16T01:52:15+5:302015-08-16T01:52:15+5:30
मुंबई पोलिसांनी नैतिकता शिकवू नये किंवा आव आणू नये, अशी ओरड वारंवार समाजातून होते. एकांत शोधणाऱ्या जोडप्यांविरोधात पोलिसांनी उपाय योजले, तेव्हाही अशीच ओरड झाली.
- जयेश शिरसाट
मुंबई पोलिसांनी नैतिकता शिकवू नये किंवा आव आणू नये, अशी ओरड वारंवार समाजातून होते. एकांत शोधणाऱ्या जोडप्यांविरोधात पोलिसांनी उपाय योजले, तेव्हाही अशीच ओरड झाली.
मध्यरात्रीचे ३ वाजलेले. भरधाव वेगातली बाईक माहीम परिसरात थांबते. मागे बसलेली विशीतली तरुणी खाली उतरून फूटपाथवर गप्पा तासत बसलेल्या घोळक्याकडे इथे सिगारेट कुठे मिळेल, याबाबत चौकशी करते. मध्यरात्रीच्या तीन वाजता रस्त्यावर चिटपाखरू नसताना एक सुरूप तरुणी धड मिसरूड न ुफुटलेल्या मित्रासोबत एकटी... घोळक्यातले काही तरुण या संधीचा गैरफायदा घेतात. आमच्या मागे या, आम्ही दाखवतो सिगारेट कुठे मिळेल, असे सांगून दोघांना एकाकी ठिकाणी नेतात. तिथे या तरुणीचा विनयभंग होतो. अनोळखी तरुणांच्या घोळक्यातून कशीबशी सुटका करून घेत तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचते. घडलेला प्रसंग सांगते. महिला पोलीस शिपाई तिचा जबाब नोंदवून घेते. जबाब नोंदवून घेताना ती या तरुणीला दरडावते. मध्यरात्री एकटी घरातून बाहेर का पडलीस, भीती नाही वाटली का, पालक कशी काय परवानगी देतात तुम्हाला वगैरे वगैरे़़़ पोलीस महिलेने काळजीने, स्वत:चीच मुलगी समजून अधिकाराने विचारलेले प्रश्न मात्र त्या तरुणीला मॉरल पोलिसिंग वाटते. मला नैतिकता शिकवणारे तुम्ही कोण, तुम्ही तुमचे काम करा, असा विचार तिच्या मनात शिरतो. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर घडला प्रकार पत्रकारांना सांगते. मात्र या सांगण्यात घटनेऐवजी जबाब नोंदवून घेणाऱ्या महिला पोलिसाने विचारलेल्या प्रश्नांवर ती जास्त जोर देते.
अनेकदा अतिप्रसंगाच्या किंवा इतर काही वाईट घटना घडल्यावर त्याचे खापर पोलिसांवरच फुटते. त्या घडू नयेत म्हणून उपाय योजले तर पोलीस नैतिकता शिकवतात, अशी बोंब ठोकली जाते. दोन आठवड्यांपूर्वी मालवणी पोलिसांनी आक्सा, मढ किनाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर समाजातून अशीच बोंब सुरू झाली आहे.
अशा घटनांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. दबाव झुगारून आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे न राहता त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो. निलंबन, बडतर्फी किंवा विनाकारण अपमानास्पदरीत्या होऊ घातलेल्या बदलीची टांगती तलवार, या अधिकाऱ्यांच्या मानेवर ठेवली जाते. या सर्वातून प्रत्यक्ष काम करणाऱ्या पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होते.
ही दुसऱ्याची पत्नी आहे, हे माहीत असूनही तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हा आहे. मालवणीत ज्या हॉटेलांवर कारवाई झाली ती तासाच्या हिशोबाने खोल्या देणारी आहेत. तिथे वेश्याव्यवसाय चालतो. याआधीही तिथे बलात्कारासारखा गंभीर गुन्हा घडलेला आहे.
भविष्यात या गुन्ह्याची पुनरावृत्ती झाली तर जनता ते खापर आमच्यावरच फोडणार, ही पोलिसांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये आदेश देणाऱ्या वरिष्ठांवर कधीच बालंट येत नाही. अडकतात, आक्रोशाला बळी पडतात ते पोलीस ठाण्यातले अधिकारी -कर्मचारी.
कारवाईचे आदेश देणारे वरिष्ठ अधिकारी प्रत्येकवेळी चौकशीत आपले हात वर करतात आणि हाताखालच्या अधिकाऱ्यांची मान देऊन मोकळे होतात. मढ, आक्सा किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
वरिष्ठ पाठी उभे राहतील ही आशा तर पोलिसांनी कधीच सोडली आहे. फक्त अशा चौकशा पारदर्शकपणे व्हाव्यात आणि त्यात खऱ्या दोषींवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.