मुंबई - दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मंगळवारी (30 ऑक्टोबर) गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ला यश मिळाले. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये जवळपास ३५० लीटर भेसळ दूध हस्तगत करण्यात आले असुन याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरसय्या थोडासू (४७), रवी निम्मागौटी (४०), वेंकय्या मुकाम्मला (४०) आणि साहिलकुमार थोडासू (२४) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे चौघे अंधेरी पश्चिमच्या जीवननगर परिसरात राहतात. दूध भेसळ करणारी टोळी अंधेरीत कार्यरत असल्याची माहिती कक्ष ९ चे प्रमुख महेश देसाई यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास सपोनि शेख, जाधव, पोउनी कोरे या त्यांच्या पथकाने एफडीएसोबत जीवननगरमध्ये खोली क्रमांक १५२ आणि २९० मध्ये धाड टाकली. तेव्हा चार जण दूध भेसळ करत असताना त्यांना रंगेहाथ सापडले. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले.
'आम्ही घटनास्थळाहुन अमूल ताजा, अमूल गोल्ड, गोकुल क्रीम या कंपन्यांचे १६ हजार ९४७ रुपये किमतीचे भेसळ दूध हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अमूल कंपनीच्या १२८ रिकाम्या पिशव्यांसह ब्लेड, मेणबत्ती, पुनेल, स्टोव्ह आणि कैची हे पॅकिंगसाठी वापरले जाणारे तेराशे रुपयांचे साहित्य देखील ताब्यात घेतले असल्याचे ते म्हणाले. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांना पुढील कारवाईसाठी अंबोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असुन त्यांना अटक करण्यात आली आहे.