Join us

पोलीसही आता दिसणार सफारीत! : व्हीव्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी खास गणवेश

By मनीषा म्हात्रे | Published: November 16, 2017 2:47 AM

एखाद्या सफारीतील व्यक्तीने तुम्हाला हटकल्यास चिडू नका, कारण तो पोलीसच असणार आहे. मुंबईतील व्हीव्हीआयपींसह अतिमहत्त्वाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षा विभागातून तैनात करण्यात

मुंबई : एखाद्या सफारीतील व्यक्तीने तुम्हाला हटकल्यास चिडू नका, कारण तो पोलीसच असणार आहे. मुंबईतील व्हीव्हीआयपींसह अतिमहत्त्वाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षा विभागातून तैनात करण्यात येणा-या अंमलदार आणि अधिका-यांना स्टील ग्रे रंगाची सफारी आणि काळ्या रंगाचे आॅक्स्फर्ड शूज असा गणवेश देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. मात्र, हा सफारीचा खर्च करणार कोण, याबाबत संभ्रम आहे.संरक्षण आणि सुरक्षा विभागांतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सुरक्षा शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक (तांत्रिक शाखा), सुरक्षा शाखेकडून परदेशी वकालती व त्यांच्या आस्थापनांच्या ठिकाणी नेमण्यात येणारे अंमलदार, तसेच सर्व कार्यालयीन कामकाज करणारे अधिकारी व अंमलदारांनाही ही सफारी आणि शूज बंधनकाकरक करण्यात आले आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त (संरक्षण) विनायक देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.या विभागात सुमारे ८०० कर्मचारी कार्यरत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. डी. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त विनायक देशमुख (संरक्षण) आणि प्रदीप सावंत (सुरक्षा) यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी फक्त व्हीव्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी याच विभागाचे विशेष सुरक्षा कक्षातील तैनात असलेले अधिकारी सफारीमध्ये दिसायचे. मात्र, अन्य शाखांमधील अधिकारी व अंमलदारांची जेव्हा महत्त्वाचे बंदोबस्त, घातपात विरोधी तपासणी व तत्सम कर्तव्याकरिता नेमणूक करण्यात येते, त्या वेळेस त्यांचे वेगळे अस्तित्व त्या ठिकाणी जाणवणे आवश्यक असल्याने, त्यांना विशेष गणवेश देणे प्रस्तावित होते, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले.खर्च भागवायचा कसा?पूर्वी पोलिसांना गणवेशाचे कापड देण्यात येत होते. त्यानंतर, ते बंद करून त्यांना गणवेश भत्ता देण्यास सुरुवात झाली. ही प्रथा अद्यापपर्यंत कायम आहे. परंतु आता पोलिसांना सफारी देण्यात येणार आहे. सफारी देण्याच्या या निर्णयानंतर संरक्षण व सुरक्षा विभागातील अंमलदार आणि अधिकारी मात्र, चांगलेच संभ्रमात आहेत. कारण सफारीच्या खर्चाबाबत त्यांना काहीच माहीत नाही. गणवेशाच्या भत्त्यातच सफारीचाही खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस