संदीप देशपांडे अन् संतोष धुरींचा अजूनही पोलिसांकडून शोध सुरु; क्राईम ब्राँचच्या ३ टीम तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 09:19 PM2022-05-07T21:19:03+5:302022-05-07T21:19:11+5:30
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई- मुंबईत दादर येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानाबाहेर पोलिसांना चकवा देऊन मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पसार होत असताना झालेल्या गदारोळात महिला पोलीस जखमी झाली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा शोध घेतला जात आहे.
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या १० टीम केल्या तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुंबई क्राईम ब्राँचच्या ३ टीम देखील मनसेच्या या दोन्ही नेत्यांचा शोध घेत आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरही या दोघांचा शोध असल्याची माहिती मिळत आहे.
संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक-
संदीप देशपांडे पोलिसांच्या हातून निसटून जात असताना त्यांची कार दामटवणाऱ्या ड्रायव्हरला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे.
देशपांडेंनी सांगितला पोलिसी प्रोटोकॉल-
महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दाखवली.