भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे! नारायण मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:22 AM2018-12-27T05:22:31+5:302018-12-27T05:22:58+5:30
कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्यांवर आळा घालणे, आणीबाणीची स्थिती सुधारणे आणि समाज गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी मदत करणे, ही पोलिसांची जबाबदारी लोकशाहीत नमूद केली आहे.
मुंबई : कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्यांवर आळा घालणे, आणीबाणीची स्थिती सुधारणे आणि समाज गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी मदत करणे, ही पोलिसांची जबाबदारी लोकशाहीत नमूद केली आहे. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे जतन आणि भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे आहे, असे प्रतिपादन इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ‘पोलीस जीवन गौरव पुरस्कार २०१८’ या सोहळ््यावेळी केले.
अरविंद इनामदार फाउंडेशनच्यावतीने ‘पोलीस जीवन गौरव पुरस्कार २०१८’ सोहळा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात बुधवारी पार पडला. या वेळी नारायण मूर्ती
बोलत होते. याप्रसंगी टाटा समूहाचे रतन टाटा, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर आणि मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार या वेळी म्हणाले की, पोलिसांची नोकरी धोकादायक आहे. हल्ली पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. समाजात गुंड प्रवृत्तीची माणसेही वाढत आहेत. पोलिसांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ लागले, तर संकटकाळी नागरिकांच्या मदतीला कोण येणार?, असा सवालही त्यांनी केला. मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैस्वाल यांनीही आपले मत व्यक्त केले. तसेच सत्कार मुर्तींनी आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगितले.