- मनीषा म्हात्रे मुंबई - अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत शिक्षा सुनावलेला आरोपी प्यारोलवरुन पसार झाला. त्याचा शोध सुरु असतानाच, तो एका लग्नाच्या वरातीत नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लग्न सोहळ्या दरम्यान कारवाई कशी करणार? म्हणून पोलिसांनी व-हाडी बनून लग्नाच्या वरातीत सहभाग घेतला. आणि वरातीत नाचण्यात गुंग असलेल्या मनोजकुमार सत्यनारायण पासवान उर्फ गब्बर आरोपीला बेड्या ठोकल्या.आरे पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यांत २०१२ मध्ये गब्बरला आरे पोलिसांनी अटक झाली. या गुन्ह्यांत त्याला दोषी ठरविण्यात आले. न्यायालयात शिक्षा भोगत असताना प्यारोलदरम्यान तो फरार झाला. त्याच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांनी शोध सुरु केला. अशात सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास तो नातेवाईकाच्या लग्नाच्या वरातीत नाचत असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली.त्यानुसार, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लग्नाच्या वरातीदरम्यान कारवाई केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून पोलीस यामध्ये व-हाडी बनून सहभागी झाले. नाचत नाचत त्यांनी गब्बर भोवती सापळा रचला. आणि त्याला तेथून बाहेर काढले. क्षणभर गब्बरही गोंधळात पडला. अखेर ते व-हाडी नसून पोलीस असल्याचे समजताच गब्बरच्याही भुवया उंचावल्या. त्याला यामध्ये अटक केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती आरे पोलिसांनी दिली.
पोलिसांनी लग्नाच्या वरातीत व-हाडी बनून ठोकल्या आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 7:53 PM