मुंबई : गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत परप्रांतीय गुंडाला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. लखनसिंग गोविंदभाई चौहान (२१, रा. उमराटी, ता. वाराला, जि. बेडवानी, मध्य प्रदेश) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून १० अग्निशस्रे, सहा जिवंत काडतुसे व दोन पिस्तूल जप्त केली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-७ ने ही कारवाई केली. लखनसिंगचे अन्य दोन साथीदार पसार असून, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे विभागाचे पोलीस उपयुक्त अकबर पठाण यांनी सांगितले.
घाटकोपरच्या युनिट -७ ने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये तिघांना अटक करून शस्त्रे जप्त केली होती. ती बनविणारा म्होरक्या लखनसिंग हा मात्र फरार होता. नावे बदलून तो विविध राज्यात राहत होता. तो पूर्व द्रुतगती मार्गावर येणार असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना शुक्रवारी मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत तेथे पाळत ठेवून दुपारी साडेतीनच्या सुमारास संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना हटकले. त्यातील दोघे पळून गेले, मात्र लखनसिंगला पकडून त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली. त्यामध्ये १० अग्निशस्रे, सहा जिवंत काडतुसे व दोन मॅगझिन सापडली. त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. लखनसिंग ही शस्त्रे कोणाला देणार होता याची चाैकशी सुरू आहेण् त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे उपायुक्त पठाण यांनी सांगितले.
...........................