मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील एमव्हीएम कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात बीएमएसच्या पाचव्या सत्राचा ‘मार्केटिंग : ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाचा पेपर फुटल्याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत दहाजणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई विद्यापीठातील निकालांचा गोंधळ कायम असतानाच गुरुवारी सकाळी बीएमएसच्या पाचव्या सत्राचा ‘मार्केटिंग : ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर याप्रकरणी विद्यापीठ आणि महाविद्यालय प्रशासनाने अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासाला सुरवात केली. पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे परिमंडळ 9 चे उपायुक्त परमजीत सिंग दहिया यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठातर्फे एकूण 158 पेपरच्या परीक्षा गुरुवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील अंधेरी येथील एमव्हीएम महाविद्यालयात सुरू असलेल्या बीएमएसच्या मार्केटिंग : ई-कॉमर्स अॅण्ड डिजिटल मार्केटिंग या पेपरसाठी प्रविष्ठ असलेल्या विद्यार्थिनीकडे मोबाइल असल्याचे ज्युनियर सुपरव्हायजरच्या लक्षात आले. त्या मोबाइलमध्ये सुरू असलेल्या पेपरचीच प्रश्नपत्रिका आढळल्याने सुपरव्हायजरला धक्काच बसला. यासंदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती मिळताच त्यांनी विद्यापीठास याबाबत कळवले.
पेपरफुटीचा शोध लागणार?मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकांची ईडिलिव्हरी करण्यात येते व यामध्ये अनेक सुरक्षात्मक बाबी आहेत. तसेच ज्या महाविद्यालयात ही प्रश्नपत्रिका डाउनलोड केली जाते, त्या महाविद्यालयाचे नाव वॉटरमार्क स्वरूपात प्रिंट होते. त्यामुळे कोणत्या महाविद्यालयातून ही प्रश्नपत्रिका प्रिंट झाली हे तत्काळ समजते. असे असले तरी पेपरफुटीत सामील असलेल्यांचा शोध तत्काळ लागणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
परीक्षा सुरळीत सुरू राहणारबीएमएसच्या पाचव्या सत्राची परीक्षा 13 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. या परीक्षेचे पहिले तीन पेपर 13, 14 व 15 नोव्हेंबर या दिवशी सकाळी 11 ते 1.30 वाजता 163 परीक्षा केंद्रांवर झाले. तसेच यापुढेही परीक्षा सुरळीतपणे सुरू राहणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.