मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी ६ शिवसैनिकांना अटक, इतरांचा शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 03:26 PM2022-04-24T15:26:52+5:302022-04-24T15:30:24+5:30
मुंबईतील खार परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण या दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-
मुंबईतील खार परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राण या दाम्पत्याच्या घराबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली असून इतर कार्यकर्त्यांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं आहे.
Maharashtra | Khar police arrested 6 Shiv Sena workers after Police registered a case yesterday against party workers who created ruckus outside the residence of Navneet & Ravi Rana. Search for other accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) April 24, 2022
'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान राणा दाम्पत्यानं दिलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याचं खार येथील निवासस्थान गाठलं होतं आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून शिवसैनिकांनी राणा दाम्पत्य वास्तव्यास असलेल्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न केला होता. तसंच दिवसभर शिवसैनिकांनी या परिसरात गोंधळ घालून राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी याच प्रकरणात राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस घेत होते. याप्रकरणी आता ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच इतरांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसंच तातडीनं जामीन अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची आता तुरुंगात रवानगी होणार आहे.