दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन गेला बँकेत अन् फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:09 PM2023-05-30T13:09:55+5:302023-05-30T13:11:35+5:30
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याची घोषणा आरबीआयने केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली.
मुंबई : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून माघारी घेण्याची घोषणा आरबीआयने केल्यानंतर नागरिकांनी या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये धाव घेतली. याचाच फायदा घेत नावीद शेख(३३) नावाचा इसम बनावट नोटा घेऊन बँकेत गेल्याचा धक्कादायक प्रकार ताडदेवमध्ये समोर आला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटा जप्त करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडदेव पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
दहिसर येथील रहिवासी असलेले ३५ वर्षीय तक्रारदार हे एका खासगी बँकेच्या ताडदेव येथील शाखेत व्यवस्थापक आहेत. व्यवसायाने सेल्समन असलेला मुंब्रा येथील रहिवासी शेख हा २६ मे च्या दुपारी तीनच्या सुमारास दोन हजार रुपयांच्या दहा नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत आला. त्याने अर्ज भरून नोटा बदलण्यासाठी बँकेतील रोखपालाकडे दिल्या. रोखपालाने नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे लक्षात आले. ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजताच त्यांनीही तपासणी केली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ताडदेव पोलिस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली आहे.
मालकाच्या नोटा...
नोटांबाबत नावीदकडे चाैकशी करताच, तो नोकरी करत असलेल्या नागपाड्यातील दुकानाचे मालक इसरार शेख यांनी या नोटा बदलून आणण्यासाठी दिल्याचे सांगितले. याबाबत ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहे.