Pravin Lonkar Baba Siddique: मुंबईतील निर्मलनगरमध्ये बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे. २८ वर्षीय लोणकरचा पोलीस शोध घेत होते. बाबा सिद्धिकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्याने पोस्टमधून केला. त्यानंतर पोलिसांनी लोणकर भावांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.
बाबा सिद्दिकींच्या हत्या : प्रवीण लोणकर कोण?
२८ वर्षीय प्रवीण लोणकर याला पुण्यात अटक करण्यात आली. प्रवीण लोणकर हा शुभम लोणकर याचा मोठा भाऊ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोणकरसह प्रवीण लोणकरही बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कटात सहभागी होता.
त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कटात धर्मराज कश्यप आणि शिव कुमार गौतम यांना सहभागी करून घेतले होते. प्रवीण लोणकरसह पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून, दोघांचा शोध घेत आहेत.
२०१४ पासून गावातून फरार
अकोट तालुक्यातील नेव्हरी येथील शुभम लोणकर याचा गत काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगशी संपर्क आल्याने अकोला व अकोट पोलिसांनी त्याच्या मूळगावात शोध घेतला. मात्र, त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव सोडले होते. बिष्णोई गँगशी संबंध असलेल्या शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाही. त्याचे घर बंद असल्याने शेजारी विचारपूस केली असता, जून २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात ते अकोट सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
शुभम लोणकरने पोस्ट शेअर केली होती. अनुज थापन याच्या मृत्यूचा बदला म्हणून ही हत्या केल्याचे पोस्टमध्ये म्हटलेले आहे. जो सलमान खान आणि दाऊद गँगची मदत करणाऱ्यांनी तयार राहावं, अशी धमकी या पोस्टमधून दिली गेलीये. शुभम लोणकर हा पुण्यातील वारजेनगरमध्ये राहायचा, त्याला ३० जानेवारी रोजी पुणे पोलिसांनी दुसऱ्या एका प्रकरणात अटक केली होती.