Join us

सीसीटीव्हीतील 'ती' अपंग व्यक्ती निघाली चोर; १२ चोऱ्या करणारी जोडी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 4:59 PM

एक - दोन नव्हे तर चोरीचे तब्बल  १२ गुन्हे उघड

मुंबई - चोरीच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये  एक अपंग व्यक्ती दिसली आणि एक - दोन नव्हे तर चोरीचे तब्बल  १२ गुन्हे उघड झाले आहेत. मालाड पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या गुन्हे वाढले होते. घटनास्थळाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला अपंग व्यक्ती हा पोलिसांचा तपासाचा मुख्य धागा बनला आणि पोलिसांनी शिवकुमार दुबे (वय - २३, अपंग व्यक्ती) आणि मुकेश दुबे (वय - २५) या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

मालाड, चारकोप आणि कांदिवली परिसरात गेले अनेक दिवस चोरीचे सत्र सुरु आहे. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हांची नोंद देखील आहे. पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी घटनास्थळाहून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. बहुतांश सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक लंगडत चालणारी अपंग व्यक्ती आढळून आली. पोलीस गस्ती घालत असताना मालाड येथील लिबर्टी गार्डन परिसरात तशीच अपंग व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडली आणि पोलिसांनी त्याला घेरले. त्यावेळी पोलिसांना शिवकुमारने धारदार शस्त्राचा धाक दाखवत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने शिवकुमारला जेरबंद केले. त्यानंतर शिवकुमारने चौकशीत ९ चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आणि दुसरा आरोपी मुकेश दुबे हा दुसरा आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यात मालाड आणि कांदिवली परिसरात जवळपास १२ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र, तपासादरम्यान प्राप्त झालेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेली अपंग व्यक्ती हाच सामान्य घटक होता. तपासात याच गोष्टीवर भर देत यशस्वीपणे आरोपीला अटक करण्यात आले आहे.  

टॅग्स :मुंबईदरोडासीसीटीव्ही