व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 05:37 AM2024-05-16T05:37:49+5:302024-05-16T05:38:29+5:30
सेवानिवृत्त पोलिस आणि पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी असलेला १७ कोटी रुपयांचा काळा पैसा घरात दडवून ठेवल्याचे सांगून माटुंग्यातील प्रसिद्ध ‘म्हैसूर कॅफे’ मालकाच्या सायन येथील घरावर दरोडा टाकून २५ लाख रुपये लुटल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे दोन पोलिसांच्या मदतीनेच हा दरोडा टाकण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस आणि पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
बाळासाहेब भागवत (५०), दिनकर साळवे (६०), सागर रेडेकर (४२), वसंत नाईक (५२), श्याम गायकवाड (५२) आणि नीरज खंडागळे (३५), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात दोन आजी- माजी पोलिसांचा समावेश असून, गुन्ह्यात वापरलेले पोलिस वाहन जप्त केले आहे. भागवत हा मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन विभागात कार्यरत आहे, तर साळवे सेवानिवृत्त पोलिस आहे. माटुंग्यातील माहेश्वरी उद्यान येथे असलेल्या ‘म्हैसूर कॅफे’ हॉटेलचे मालक नरेश नायक (४४) हे सायन रुग्णालयासमोर राहतात. ते सोमवारी घरी एकटेच असताना सायंकाळी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून साध्या वेशातील सहा जण घरात घुसले. यातील दोघांनी पोलिसांचे ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला.
विरोध करताच धमकी
आम्ही निवडणूक ड्यूटीवर असून, तुमच्या घरात निवडणुकीत वापरण्यासाठी १७ कोटी रुपये रक्कम असल्याची माहिती मिळाल्याचे सांगून घर झडती सुरू केली. नायक यांनी त्यांना विरोध करताच नग्न करून इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या पोलिस जीपमध्ये घालून रेस्टॉरंटला नेऊ, अशी धमकी दिली. या प्रकाराने ते घाबरले. झडतीदरम्यान घरातील कपाटात २५ लाख रुपयांची रोकड सापडली.
दोन कोटींची मागणी
- नायक यांनी ही रोकड हॉटेल व्यवसायातील असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी नायक यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, प्रकरण मिटविण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली.
- एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्याने ते सहा जण २५ लाख रुपयांची रोकड घेत तेथून पसार झाले. नायक यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पोलिस जीप शोधून काढली. नायक यांच्याकडे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला यात अटक करण्यात आली आहे. त्याच्या माहितीवरूनच हा कट रचल्याचे समजते.