लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कफ परेडमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर आरोपीने ब्लेडने वार केला, तर धारावीत पोलिसाला मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी संबंधित पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दखल केला असून धारावीच्या घटनेत तिघांना अटक करण्यात आली, तर कफ परेडच्या प्रकरणातील आरोपीला ठाण्यातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कफ परेड पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत यांच्या फिर्यादीवरून गुलाम शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गुन्ह्यातील शेखला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. गुरुवारी सायंकाळी शेख पोलिस ठाण्यात हजर झाला. चाैकशी सुरू असताना शेखने पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिस ठाण्यातून पळ काढला. पोलिसही त्याच्या मागावर गेले. येथील मेट्रोच्या गोडाऊनमधील मोकळ्या मैदानात पोलिसांना शेख दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने तोंडातील ब्लेड बाहेर काढून स्वत:वर सपासप वार करून घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी पुढे गेलेल्या पोलिसांवरही त्याने हल्ला केला.
दुसऱ्या घटनेत धारावीत पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी धारावी पोलिसांनी अक्षय देवराम जाधव (वय ३०), सिद्धात सचिन साळवी (३०) आणि विठ्ठल संतोश टेंबे (२५) या तिघांना अटक केली आहे.