मुंबई : रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्र येत गणेशोत्सव काळात सर्वात जास्त गर्दी होणाऱ्या प्रमुख १३ रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. यात मध्य रेल्वेवरील ९ आणि पश्चिम रेल्वेवरील ४ स्थानकांचा समावेश आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि अन्य गणरायांच्या दर्शनासाठी पहिल्या लोकलपासून ते शेवटच्या लोकलपर्यंत गर्दी कायम असते. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भायखळा, करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकांवर विशेष पथके तैनात आहेत.पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, चर्नी रोड, मरिन लाइन्स आणि मुंबई सेंट्रल स्थानकावर पोलिसांसह आरपीएफ जवानांची करडी नजर असेल. आरपीएफतर्फे नेहमीची ड्युटी वगळता प्रमुख स्थानकांवर एका सत्रात पाच जवान या प्रमाणे दिवसभर तीन सत्रांंत अतिरिक्त जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह दादर, ठाणे, दिवा, पनवेल, रोहा स्थानकांवर आणि कोकण मार्गावरील मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठीही सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे.
गणेशोत्सवात जास्त गर्दीच्या १३ स्थानकांवर पोलिसांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:49 AM