पोलीस निरीक्षकांच्या घरी लय भारी 'पोलीस बाप्पा', नागरिकांना दिला मोलाचा सल्ला
By मनोहर कुंभेजकर | Published: September 3, 2022 06:58 PM2022-09-03T18:58:54+5:302022-09-03T19:07:32+5:30
या वर्षी त्यांनी हातात मोबाईल घेतलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे.
मुंबई-गणेशोत्सव म्हणजे समाजप्रबोधनाचं सर्वात मोठं व्यासपीठ आहे. विलेपार्ले पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांनी त्यांच्या पार्ल्याच्या घरी सायबर फसवणूकीबद्दल सावध राहा असा संदेश देणारा अनोखा देखावा साकारला आहे. इचलकरंजीचे सुपुत्र राजेंद्र काणे हे गेली पाच वर्षे आपल्या घरी पोलीस रुपात पोलीस बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. या वर्षी त्यांनी हातात मोबाईल घेतलेल्या बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे.
त्यांचा या वर्षीचा बाप्पा सायबर फ्रॉड वर आधारित आहे. सायबर फ्रॉड कसे होतात, नागरिकांनी कशी काळजी घ्यावी यावर त्यांनी देखाव्यातून भाष्य केले आहे. सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे.यामध्ये सामान्य नागरिकांपासून ते उच्च शिक्षित नागरिक सायबर क्राईमच्या जाळ्यात फसतात.आपले क्रेडिट,डेबिट व मोबाईल कार्ड बंद होणार असल्याचा जर निनावी फोन आला तर पॅनिक होऊ नका, आपला ओटीपी,केवायसी देऊ नका आणि सायबर फसवणूकीपासून सावध राहा असा संदेश देणारा अनोखा देखावा त्यांनी साकारला आहे.
सायबर क्राईम पासून जन जागृती करण्यासाठी सायबर क्राईम वर आधारित गाण्याची निर्मिती केली असून त्याचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या उपस्थित करण्यात आले.तर भाविकांच्या दर्शनासाठी बाप्पाची मूर्ती मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या हस्ते खुली करण्यात आली.
गीत लेखन राजेंद्र काणे,अरुण काशीद,अनिल हर्डीकर यांनी केले आहे.या गीताला स्वर साज अवधूत गुप्ते,वैशाली सामंत या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायकांनी चढवला आहे.संगीत निहार शेंबेकर यांचे आहे.दिग्दर्शन राहुल खंदारे यांनी केले आहे.या गाण्यात प्रदीप वेलणकर, पुष्कर श्रोत्री, ऋषिकेश जोशी, चिन्मय सुमित, वैशाली सामंत, जयवंत वाडकर, माधव डीवोचके गौरीश शिपूरकर आदींनी काम केले आहे. यासाठी नीरज राजपुरीया आणि श्री अधिकारी ब्रदर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.