मेट्रो जंक्शनकडे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवले, नांगरे पाटील जमावाची समजूत काढण्यासाठी सरसावले
मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेनं मोर्चाचं आयोजन केलं आहे. नाशिकहून आलेला मोर्चा सध्या आझाद मैदानात असून थोड्याच वेळात तो राजभवनावर धडकणार आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा शेतकऱ्यांच्या मानस आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागू शकते. मात्र, मेट्रो जंक्शन परिसरात पोलिसांनी शेतकऱ्यांना अडविले आहे. काही जण पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील जमावाला समजाविण्याचा प्रयत्न करत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर १०० अधिकारी ५०० अंमलदारांचा अतिरिक्त फ़ौजफाटा तैनात आहे. तसेच एसआरपीएफच्या ९ तुकडया त्यांच्या मदतीला तैनात असून ड्रोनद्वारे सर्व हालचालींवर सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.
मेट्रो सिनेमा परिसरात शेतकऱ्यांचा ठिय्या राजकीय नेते मंडळीसोबत पोलिसांची चर्चा सुरु होती असून राज्यपाल गोव्याला असल्याने ते मुंबईत येईपर्यंत मोर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, काही नेत्यांना पोलीस वाहनांत बसविण्यात येत आहे. शेतकरी मोर्चाचे २३ जणांचे शिष्टमंडळ पोलीस वाहनांतून राजभवनाकड़े निघाले होते. मात्र, पोलीस वाहनातून राजभवनाकडे जाणारे शिष्टमंडळ पुन्हा खाली उतरून राज्यपाल नसल्याने जायचे की नाही याबाबत चर्चा करत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या राजभवनात नाहीत. ते गोव्यात आहेत. कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे राज्यपालांकडून शेतकरी मोर्चाच्या शिष्टमंडळाला संध्याकाळी पाचची वेळ दिली असल्याचं समजतं. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत आलेले शेतकरी आज मुक्काम करण्याची शक्यता आहे.