मुंबई- अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे.
Video: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांकडूनही दगडफेक
एका वृत्तवाहिनेला बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर प्रतिक्रीया दिली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'लाठीचार्जची मी माहिती घेतली आहे, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती खरी आहे. यात काही लोक जखमी झाले आहेत, ही बातमी दुर्देवी आहे. या संदर्भात मी आता माहिती घेत आहे. उपोषणकर्त्या सोबत मी दोन दिवसापूर्वी बोललो होतो, असंही शिंदे म्हणाले.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील त्या समितीचे अध्यक्ष आहेत. यावर आमच्या बैठका सुरू होत्या, उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली होती म्हणून पोलिस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले होते. यावेळी हा दंगा झाला आहे. हा प्रकार व्हायला नको होता, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाई अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांकडूनही दगडफेक
अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, आश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत. यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह आंदोलकही जखमी झाले आहेत.मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अंबड तालुक्यातील २२ गावांमध्ये आज बंद पाळण्यात आला. तसेच गेवराई (ता.बीड) तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारून या आंदोलनाच्या समर्थनार्थ अंतरवाली सराटी गावापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी २९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर- सोलापूर महामार्गावर मोर्चा काढला होता. त्यानंतर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोबाइलद्वारे मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. शिवाय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने शासन सकारात्मक पावले टाकत असल्याचे सांगितले होते. परंतु, जरांगे यांनी आजवर आश्वासनाशिवाय काही हाती पडले नसल्याचे सांगत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या उपोषणाच्या चौथ्या दिवशी १ सप्टेंबर रोजी अंबड तालुक्यातील शहागडसह परिसरातील आपेगाव ते हसनापूरपर्यंतच्या २२ गावांनी कडकडीत बंद पाळून आपला सहभाग नोंदविला. शिवाय गेवराई तालुक्यातील अनेक गावांनीही या बंदमध्ये सहभागी होत गावातून अंतरवाली सराटीपर्यंत दुचाकी रॅली काढली होती.