पोलिसांचे खबरीच बनले खंडणीखोर
By admin | Published: May 12, 2016 02:33 AM2016-05-12T02:33:26+5:302016-05-12T02:33:26+5:30
मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचे हुकमी एक्के म्हणजे खबरी. तथापि, पोलिसांची जवळीक असल्याचा फायदा घेत, हेच खबरी आता खंडणीखोर बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ग्रँटरोड येथे समोर आले
मनीषा म्हात्रे, मुंबई
मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचे हुकमी एक्के म्हणजे खबरी. तथापि, पोलिसांची जवळीक असल्याचा फायदा घेत, हेच खबरी आता खंडणीखोर बनत असल्याचे धक्कादायक वास्तव ग्रँटरोड येथे समोर आले. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, बारबाला, दलाल यांना टार्गेट करून त्यांच्याकडून लाखो रुपये हे खबरी लुबाडत असल्याचे समोर आले आहे.
ग्रँटरोड परिसरात पोलिसांना माहिती देण्याचे धमकावून, चौघे आरोपी खंडणी उकळत असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर, काही महिलांच्या तक्रारीही त्यांना प्राप्त झाल्या. या चारही आरोपी खबऱ्यांच्या मुसक्या डी.बी. मार्ग पोलिसांनी आवळल्या.
सुदई यादव उर्फ तरुण मास्टर (वय ३०, गिरगाव), प्रसादी ढालू मंडल (वय ३२, विरार), ज्ञानेश्वर नाईक उर्फ सुशांत (वय २४, चिंचपोकळी), समीर रॉबीन पुरकाईत (वय ४३, चिंचपोकळी) अशी अटक केलेल्या खबऱ्यांची नावे आहेत. हे चौघेही समाजसेवा शाखेसाठी खबरी म्हणून काम करत होते. गेल्या काही महिन्यांपासून या चौकडीने पैसे कमवण्यासाठी येथील वेशाव्यवसाय करणाऱ्या महिला, बार गर्ल यांना लक्ष्य केले. पोलिसांकडून छापा टाकण्याची धमकी देत, त्यांच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले. पैसे न दिल्यास या महिलांना मारहाणही केली. छापा मारलेल्या ठिकाणी पुन्हा सुरू झालेल्या अवैध कारभाराची माहिती काढून, तेथेही ही चौकडी पैसे उकळण्याचा धंदा करत होती. मात्र, वारंवार पैसे देऊनही या खबऱ्यांची मागणी कमी होत नसल्याने काही महिलांनी ही माहिती पोलिसांना दिली. डी. बी. मार्ग पोलीस ठाणे गाठून त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करत चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अधिक
तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खबऱ्यांमुळे सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना सहज शक्य झाले. त्यामुळे काही प्रमाणात खबऱ्यांचे जाळेही कमी झाले आहे. पर्यायी हे खबरीच खंडणीखोर बनत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.
हे खबरी डान्स बार मालक, हॉटेल चालक, तसेच अवैध बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत असतात. पोलिसांचे खबरी असल्याने, त्यांच्यावर कारवाई होण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे या खंडणीखोर खबऱ्यांवर निर्बंध आणण्याचे आव्हान सध्या मुंबई पोलिसांसमोर आहे.