पोलीस होण्याआधीच चोरांचा धसका

By Admin | Published: April 26, 2017 12:36 AM2017-04-26T00:36:18+5:302017-04-26T00:36:18+5:30

मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. खेडोपाड्यातून आलेल्या या उमेदवारांचे सामान गायब

Before the police became the thieves of thieves | पोलीस होण्याआधीच चोरांचा धसका

पोलीस होण्याआधीच चोरांचा धसका

googlenewsNext

मनीषा म्हात्रे/ मुंबई
मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सध्या मैदानी चाचणीपेक्षा वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. खेडोपाड्यातून आलेल्या या उमेदवारांचे सामान गायब होत आहे. त्यामुळे पोलीस होण्याआधीच उमेदवारांनी चोरांचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यभरात ५९७१ पोलीस शिपाई पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे. यापैकी मुंबईत १७०० जागांसाठी तब्बल १ लाख ७२ हजार उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई प्रशासन विभागाचे सह पोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही पोलीस भरती सुरू आहे. जवळपास १८ हजार पोलिसांचा फौजफाटा त्यांच्यासाठी तैनात आहे. मुंबईत जास्त जागा असल्याने मुंबईतील पोलीस भरतीत आपले नशीब आजमाविण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यांसह खेडोपाड्यांतून तरुण-तरुणी आले आहेत. अशाच प्रकारे कळव्यातील ओम्कार आंबेडकरनेही मुंबईतील विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर सुरू असलेल्या मैदानी चाचणीचे केंद्र गाठले. बॅग केंद्रावर ठेवून मैदानी चाचणीसाठी गेला. परंतु, आल्यानंतर बॅग हरवल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्व परिसर पिंजून काढला. पण, बॅग काही सापडली नाही. बॅगेत त्याचा मोबाइल आणि काही पैसे होते. नाशिकवरून पोलीस भरतीसाठी आलेल्या संजय चौधरीसोबतही चोरीचा असाच प्रकार घडला. ओम्कार आणि संजय हे दोघेच नव्हे, तर या दोघांसारख्या अनेकांना भुरट्या चोरांच्या उच्छादाला सामोरे जावे लागत आहे. नवी मुंबईच्या पोलीस भरतीतही पैसे चोरीला गेले होते, असे चौधरीने सांगितले. चोरांनी थेट पोलीस केंद्रात घुसून उमेदवारांच्या बॅगा, पाकीट लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. केंद्राशेजारी असलेल्या झाडीत पडलेल्या बॅगा आणि उमेदवारांच्या कागदपत्रांवरून याची प्रचिती येत आहे. याहूनही कहर म्हणजे आपला ऐवज हरवल्याची तक्रार नोंदविणाऱ्या उमेदवारांच्या हाती कुठलाही गुन्हा नोंद न करता गहाळ पत्र स्थानिक पोलीस देत असल्याचा उमेदवारांचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती न देता यावर बोलणे टाळले.

Web Title: Before the police became the thieves of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.