दिवसाला दहा हजार उमेदवारांची चाचणी; कुटुंबीयांच्या गर्दीवर नियंत्रणाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:35 AM2024-08-09T09:35:34+5:302024-08-09T09:35:46+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांना वेगवगेळ्या वेळेत बोलावण्यात येत आहे. दूरवरचे उमदेवार आदल्या दिवशी येत आहेत.
मुंबई : पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान दिवसाला दहा हजार उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे. अशावेळी उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. |
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांना वेगवगेळ्या वेळेत बोलावण्यात येत आहे. दूरवरचे उमदेवार आदल्या दिवशी येत आहेत. त्यासाठी दोन्ही मैदानांवर उमेदवारांच्या निवाऱ्याबरोबरच अत्यावश्यक आणि मूलभूत सोयी देण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला उमेदवारांसोबत एक किंवा दोन नातेवाईक येतात. त्यामुळे जवळपास १५ हजार लोकांची गर्दी या भागात होते. त्यात उमेदवाराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस घेत आहे, मात्र त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबीयांना निवाऱ्यासह अन्य सोयी पुरवणे पोलिस दलाच्या आवाक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. भरतीच्या ठिकाणी फळे, अन्न पुरविण्याची व्यवस्था मुंबई पोलिस स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करत आहेत.
७० शौचालयांची व्यवस्था...
चाचणीच्या आदल्या दिवशी आलेल्या महिला उमेदवारांना मैदानातील छप्पर असलेली लांब गॅलरी निवाऱ्यासाठी देण्यात आली आहे. या गॅलरीखाली ३० शौचालये आहेत. मैदानात गर्दी होऊ नये यासाठी वानखेडे स्टेडियमच्या एका गॅलरीचा वापरही केला जात आहे. तेथेही शौचालये, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
चाचणीस विलंब झाल्यास मैदानात असलेल्या मुलीला जेवणाचा डबा, अन्नपदार्थ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास ७० शौचालयांची व्यवस्था असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भरतीसाठी पाच लाख ८० हजार उमेदवार आले आहेत. उमेदवाराच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस दल घेत आहे. दूरचे उमेदवार आदल्या दिवशी येत आहेत. त्यासाठी दोन्ही मैदानांवर निवाऱ्यासह अन्य अत्यावश्यक सोयी त्यांना पुरवण्यात आल्या आहेत.
- एस. जयकुमार, सहपोलिस आयुक्त (प्रशासन
सहा ते सात जणांनी घेतले इंजेक्शन...
घाटकोपर येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या चाचणी प्रक्रियेत आतापर्यंत सहा ते सात जणांनी चाचणीआधी उत्साहवर्धक, शक्तिवर्धक इंजेक्शन घेतल्याचे समोर आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी,राज्य राखीव पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेत एका उमेदवाराने अशाप्रकारचे इंजेक्शन घेतले. त्यानंतर तो हिंसक बनला, त्याने मैदानातच दगडफेक सुरू केली. अन्य उमेदवार आणि पोलिसांना मारहाण केली. त्याच्याविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.