Join us  

तोतया पोलीस गजाआड

By admin | Published: May 09, 2016 2:39 AM

बँकेतील खातेदाराचे पैसे घेऊन पळणाऱ्या लुटारूच्या एमआरए मार्ग पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या. समीर सय्यद (४३) असे आरोपीचे नाव असून

मुंबई : बँकेतील खातेदाराचे पैसे घेऊन पळणाऱ्या लुटारूच्या एमआरए मार्ग पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या. समीर सय्यद (४३) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल २१ गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस असल्याची बतावणी करून, तो मुंबईकरांना गंडा घालत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास एमआरए मार्ग पोलिसांच्या हद्दीत असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेत सय्यद आला होता. त्याच्यापुढे उभे असलेले खातेदार खात्यात २२ लाख रुपये जमा करत असल्याचे सय्यदच्या लक्षात आले. खातेदार कॅश काउंटरवर पैसे जमा करत असताना, सय्यदने त्यातील अडीच लाख हिसकावून पळ काढला. तेथील सुरक्षा रक्षकाला धक्का देत, तो बाहेर निसटला. याच दरम्यान, नागरिकांकडून ओरड सुरू असताना एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे फौजदार एस. पंडित तेथून जात होते. त्यांनी वेळीच पंडितच्या दिशेने धाव घेत, त्याच्या मुसक्या आवळल्या. सय्यदला जबरी चोरीच्या गुन्ह्यात एमआरए मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस तपासात ठाणे येथील रहिवासी असलेला सय्यद सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली. त्याने ओशिवारा, बांगुरनगर आणि मीरारोड परिसरात २१ पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून तो नागरिकांची फसवणूक करत होता. त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, जबरी चोरी, फसवणुकीसारखे गुन्हे दाखल आहेत.