Sandeep Deshpande : पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले अन् संदीप देशपांडे चकवा देऊन निसटले!, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:49 AM2022-05-04T11:49:01+5:302022-05-04T12:06:03+5:30
Police came to arrest Sandeep Deshpande but he escaped in car What exactly happened मनसेच्यावतीनं राज्यात आज मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा पठणाचं आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई
मनसेच्यावतीनं राज्यात आज मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात हनुमान चालीसा पठणाचं आंदोलन करण्यात येत आहे. मनसेच्या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे. यातच आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलीस 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आले होते. यावेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी सहा वाजता आजच्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती संदीप देशपांडे Sandeep Deshpande प्रसार माध्यमांना देण्यासाठी 'शिवतीर्थ'बाहेर आले होते. संदीप देशपांडे यांच्यासोबत मनसेचे नेते संतोष धुरी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप देशपांडेंनी आजच्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर काही पोलीस त्यांच्याजवळ आले. प्रसार माध्यमांच्या गराड्यातून पोलीस संदीप देशपांडेंच्या जवळ येत असताना संतोष धुरींनी संदीप देशपांडेंच्या खांद्यावर हात टाकून ते पुढे चालू लागले. संदीप देशपांडेंना पोलिसांनी यावेळी बाजूला येण्यास सांगितलं. देशपांडेही पोलिसांसोबत चालत पुढे आले. याच वेळी एक खासगी कार पोलिसांच्या वाहनासमोर तयार होती. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी गर्दीतून वाट काढत कार गाठली. दोघंही कारमध्ये बसताच चालकानं कार दामटवली. पोलिसांनी कारच्या मागे धाव घेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यात त्यांना यश आलं नाही. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांना चकवा देऊन निसटले.
राज ठाकरेंची पत्रकार परिषद
मनसेच्या आंदोलनाबाबत आणि पुढील माहिती देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात आज मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरही राज ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेतून भाष्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे.