Join us

पोलिसांना आता छोटी चूकही पडू शकते महागात, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:37 AM

मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त या बैठकीला उपस्थित होते.

मुंबई: मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, मुंबईतील गुन्हेगारीचा आढावा घेतला. यावेळी चांगल्या पोलिसिंगवर भर देण्याबरोबरच, पोलिसांची कुठलीही चूक माफ केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारांबे, सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर, सहआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निकेत कौशिक, वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह सर्व अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त या बैठकीला उपस्थित होते.  यावेळी मुंबईतल्या घडामोडींचा आढावा घेत, महिला, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीत गुन्ह्याबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना यावेळी नगराळे यांनी  दिल्या. रस्त्यावरील गुन्हेगारी, क्राईम रेट कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठल्याही प्रकरणात कसूर होता कामा नये, छोट्यातली छोटी चूकही सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच योग्य तपास कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. 

मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात भेटी- हेमंत नगराळे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यांतर गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. येथील कामाचा आढावा घेऊन संबंधितांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.   

टॅग्स :हेमंत नगराळेपोलिसमुंबई