गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: मालवणी परिसरात पोलीस अधिकारी फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे त्याच्यासोबत असलेल्यापैकी काही अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे समजते. मालवणी हा कंटेन्मेंट झोन असूनही पोलीस अधिकाऱ्यांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.
मालवणी हा विभाग सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहे. पालिकेचा पी उत्तर विभाग आणि स्वतः मालवणी पोलीस रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर एका बाजूला मात्र पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा इंद्राळे हे २३ जुन, २०२० रोजी एका छोट्याशा कार्यालयात जमून सुरेंद्र नामक व्यक्तीचा वाढदिवस साजरा करत असल्याचे एका फोटोत दिसत आहे. एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहून हे सेलिब्रेशन सुरू असल्याचेही यात दिसत आहे. मालवणीमध्येच हे कार्यालय असुन या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात महत्वाचे म्हणजे पोलीस अधिकाऱ्यासोबत हजर असलेल्यापैकी काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असल्याची सुत्रांची माहिती आहे. घोड्यावर बसून नवरदेवाने लग्नाची मिरवणूक काढल्याचा व्हिडीओ मालवणीत व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी १२ जुन, २०२० रोजी संबंधितांवर कारवाई केली होती. त्यामुळे आता नियम मोडून वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.