Join us  

मद्यपी बसतात म्हणून पोलिसांनी केले मैदानच बंद; रात्री आठ नंतर सर्वसामान्यांना प्रवेश बंद

By जयंत होवाळ | Published: January 05, 2024 7:27 PM

मैदानात मद्यपी बसतात म्हणून पोलीस कारवाई होणे स्वागतार्ह आहे.

मुंबई : मैदानात मद्यपी बसतात म्हणून पोलीस कारवाई होणे स्वागतार्ह आहे. मात्र विक्रोळी पोलिसांनी रोगापेक्षा इलाज  भयंकर असा प्रकार सुरु केला आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री आठ वाजल्यानंतर पोलिसांनी सर्वसामान्यांना मैदानात येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. विक्रोळी पूर्वेकडे  टागोर नगरमध्ये मुंबई महापालिकेचे  राजर्षी शाहू महाराज मैदान आहे. विशाल आकाराचे हे मैदान म्हणजे स्थानिक खेळाडूंसाठी मोठी सुविधा आहे. या मैदानात मुले क्रिकेट खेळतात, फुटबॉलचा सराव  करतात , लोक मॉर्निंग आणि इव्हिनिंग वॉकसाठी येतात. मात्र अलीकडच्या काळात रात्रीच्या  वेळी मोठ्या प्रमाणावर  मद्यपींनी मैदानाचा ताबा घेतला आहे. मोठ्या संख्येने  मद्यपी मैदानात पार्ट्या रंगवतात. काही अति उत्साही दारूकाम झाल्यावर मैदानातच बाटल्या फोडतात.  त्यामुळे अनेकदा खेळाडूंना इजा होते.  दारुड्यांचा वावर असल्याने रात्रीच्या वेळी स्थानिकांना मैदानाचा वापर करता येत नाही.

मद्यपींचा वावर रोखण्यासाठी पोलिसांची रात्री गस्त असते. एखादा राउंड मारल्यावर पोलीस निघून जातात. पोलीस आले की  मद्यपी तेवढ्या पुरते पोबारा करतात. आणि पोलिसांची पाठ फिरली की  पुन्हा अवतरतात. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या वेळेस मैदानातच तळ ठोकण्यास सुरुवात केली आहे. एक पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे दोन जवान मैदानात तैनात करण्यात आले आहेत. परिणामी मद्यपींचा वावर पूर्णपणे थांबला आहे. इथपर्यंत ठीक होते. मात्र आता पोलिस रात्री आठ नंतर कुणालाच मैदानात येऊ देत नाहीत. मैदानाचे प्रवेशद्वार बंद करतात. त्यामुळे आठ नंतर सामान्यांसाठी मैदानाची दारे बंद झाली आहेत. साहजिकच त्यांच्यात नाराजी आहे. मैदानात पोलीस असले की दारुडे येत नाहीत, मग पूर्ण मैदानच का बंद करता, सामान्यांना मैदान का नाकारता, असा नाराजीचा सूर आहे.

 अंधाराचे साम्राज्यमैदानात पुरेशी प्रकाश व्यवस्था आहे. परंतु अनेकदा काही लाईट बंद असतात. मैदानाच्या बाहेरील रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते, मैदानातील बंद पडणाऱ्या  लाईट चालू कराव्यात.  मैदानाच्या लगत असलेल्या पदपथावर लाईटची व्यवस्था असावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :मुंबई