मुंबई : ताडदेव येथे पोलीस वसाहतीतील इमारतीतील एका फ्लॅटमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर पोलीस वसाहतींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.ताडदेव येथील इमारत क्रमांक १मधील २८ क्रमांकाच्या खोलीत सुनील सावंत हे पत्नी आणि मुलीसोबत राहतात. सावंत हे विशेष शाखा परिमंडळ २मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ते येथे राहत आहेत. घरातील भिंतींना भेगा पडत असल्याने, गेल्या दोन महिन्यांपासून ते पाठपुरावा करीत होते. मात्र, सामान नाही याचे कारण देत, त्यांना चालढकल केली जात होती. दोन दिवसांपूर्वी घरातील स्लॅबचे काही भाग कोसळत होते. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची कुणकुण त्यांना लागली. कसेबसे जीव मुठीत धरून सावंत कुटुंबीयांनी दोन दिवस काढले. गुरुवारी दुपारी २ वाजता त्यांच्या तक्रारीवरून बांधकाम विभागाचे कर्मचारी खोलीची तपासणी करीत होते. त्याच दरम्यान इमारतीचा स्लॅब खाली कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सतर्कतेमुळे अनर्थ टळला, असे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. माहिती मिळताच ताडदेव पोलीस तेथे दाखल झाले. ताडदेव पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामगार स्लॅब कोसळूनदेखील तेथील काम पूर्ण न करता निघून गेले. (प्रतिनिधी)कामगार निघून गेले-च्बांधकाम विभागाचे कर्मचारी खोलीची तपासणी करत होते. त्याच दरम्यान इमारतीचा स्लॅब खाली कोसळला.च् पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामगार स्लॅब कोसळूनदेखील तेथील काम पूर्ण न करता निघून गेले.
पोलीस वसाहतींची दुरवस्था कायम
By admin | Published: October 07, 2016 6:11 AM