पोलिसानेच विकले पोलीस वसाहतीतील घर, वर्सोवा पोलीस वसाहतीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:57 PM2018-03-22T23:57:43+5:302018-03-22T23:57:43+5:30
पोलिसांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस वसाहतीतील घर स्वत:च्या मालकीचे भासवून विकण्याचा घाट घातला. हा धक्कादायक प्रकार वर्सोव्यामध्ये बुधवारी उघडकीस आला आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : पोलिसांच्या घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच एका साहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस वसाहतीतील घर स्वत:च्या मालकीचे भासवून विकण्याचा घाट घातला. हा धक्कादायक प्रकार वर्सोव्यामध्ये बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक सिराज अब्बास शेख (५७)विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलीस दलाच्या वायरलेस विभागात शेख हा साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. वर्सोवा पोलीस वसाहतीत तो कुटुंबीयांसोबत राहतो. निवृत्तीला काही दिवस उरले असताना, त्याने पोलीस वसाहतीतील घर स्वत:च्या मालकीचे असल्याचे भासवून विक्रीस काढले. घराच्या शोधात असलेल्या अंधेरीच्या सुलताना मोहम्मद इब्राहिम या महिलेसोबत त्याची ओळख झाली. सुलताना यांनी शेखकडे घराबाबत विचारणा केली, तेव्हा शेखने पोलीस वसाहतीतील त्याच्या घराबाबत सांगितले. कमी किमतीत घर नावावर करून देण्याचे आमिष शेखने सुलताना यांना दाखवले. पोलीस असल्यामुळे सुलताना यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी घर घेण्याची तयारी दाखवली. शेख याने घराची कागदपत्रे सुलताना यांच्या नावावर केली. ठरल्याप्रमाणे ९ लाख ७० हजार रुपयांंत व्यवहार झाला. घराबाबत करारनामा होताच सुलताना यांनी ते पैसे शेखला दिले. मात्र घराचा ताबा देण्यात शेख टाळाटाळ करू लागला. पुढे चौकशीत ते घर शेखच्या मालकीचे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बुधवारी दुपारी वर्सोवा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. करारनाम्याची कागदपत्रेही त्यांनी पोलिसांना दिली आहेत. सुलताना यांच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी शेखविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अद्याप अटक नाही...
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांनी दिली.