पोलीस आयुक्तांना प्रमोशनचे वेध! प्रसारमाध्यमांचे मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:26 AM2018-06-28T04:26:36+5:302018-06-28T04:26:47+5:30
अन्य क्षेत्राप्रमाणे पोलीस दलातही संघटीतपणे काम करणे अत्यावश्यक असते. सर्वांना सोबत घेवून काम करावे लागते, त्याशिवाय तुम्ही जबाबदारी योग्यपणे पार पाडू शकत नाही
मुंबई : अन्य क्षेत्राप्रमाणे पोलीस दलातही संघटीतपणे काम करणे अत्यावश्यक असते. सर्वांना सोबत घेवून काम करावे लागते, त्याशिवाय तुम्ही जबाबदारी योग्यपणे पार पाडू शकत नाही, असे मत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी व्यक्त केले. त्यांना आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरील नियुक्तीचे वेध लागले असून येत्या २-३ दिवसांत त्याबाबतची औपचारिक घोषणा गृह विभागाकडून होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी अनऔपचारिक चर्चा करत आजवर केलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले.
मात्र आपल्या कारकीर्दीतील भल्याबुऱ्या अनुभवांबाबत भाष्य न करता त्यांनी कामाबाबत समाधानी असल्याचे स्पष्ट केले. अत्यंत प्रामाणिक व मितभाषी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पडसलगीकर ३१ जानेवारी २०१६ पासून आयुक्तपदाची धूरा सांभाळत आहेत. राज्याचे पोलीस प्रमुुख सतीश माथूर येत्या ३० जूनला सेवानिवृत्त होत आहेत. माथूर यांच्या जागी सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पडसलगीकर यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे गेल्या जवळपास अडीच वर्षांत अपवादात्मकरित्या पत्रकार परिषद घेतलेल्या आयुक्तांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. खात्याच्या बंधनामुळे आपण जास्त वेळ भेटू शकलो नाही, ब्रेकिंग न्यूज दिली नाही. मात्र तुमच्यामुळे अनेकवेळा सत्य परिस्थिती समजली, त्याचा खूप उपयोग झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांना आवश्यक माहिती देण्यासंबंधी अधिकाºयांना वेळोवेळी लेखी सूचना दिल्या
होत्या, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.