मुंबई : खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला आणि त्याचा आतेभाऊ नदीम अब्दुल सत्तार यांची पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मंगळवारी कसून चौकशी केली. या टोळीशी काही पोलीस अधिकारी व अंमलदाराशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने आयुक्तांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, नदीम सत्तार आणि सलीम महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत अनुक्रमे १३ व ९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. नदीम हा शनिवारी दुबईहून परतल्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक केली. बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देऊन खंडणीसाठी धमकाविल्याप्रकरणी गँगस्टर एजाज लकडावाला, त्याचे हस्तक परवीन तारीक, सलीम महाराज यांच्यावर आतापर्यंत शहर व उपनगरातील विविध ठिकाणचे एकूण ३० गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यात आली असून फरार नदीम सत्तारलाही शनिवारी अटक झाली. तिघांकडे केलेल्या चौकशीतून त्यांचे मुंबईतील काही पोलीस अधिकारी व अंमलदारांशी निकटचे संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. बिल्डर, व्यापाऱ्यांना धमकावून रक्कम उकळण्यात त्यांचे सहकार्य मिळाले असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे गँगस्टर -पोलिसांचे लागेबांधे असल्याचे उघड झाले असून, याप्रकरणी तपास अधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार नुकताच स्वीकारल्यानंतर परमबीर सिंग यांनी या प्रकरणाची समूळ चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याअनुषंगाने शनिवारी लकडावाला बंधू व महाराज यांना त्यांच्यासमोर उभे करण्यात आले. सुमारे अर्धा तास त्यांनी तिघांची कसून चौकशी केली. त्यांनी आतापर्यंत केलेले गुन्हे, त्यांचे अन्य साथीदार आदींबाबत सविस्तर विचारणा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.>पोलीस कोठडीत वाढ : या गुन्ह्याप्रकरणी परवीन तारीक न्यायालयीन कोठडीत, तर अन्य तिघे पोलीस कोठडीत आहेत. नदीम सत्तार व महाराज यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या वेळी नदीमला १३ मार्च, तर महाराजला ९ मार्चपर्यंत कोठडीत मुदतवाढ मिळाल्याचे सांगण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी घेतली लकडावाला बंधूंची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:14 AM