मुंबई : राजकीय बिगुल वाजल्याने होळीच्या निमित्ताने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिस दलाला दिल्या आहेत. शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त आणि उपाययोजनांची आखणी करण्यास सुरुवात केली आहे.
शहरामध्ये होळी, धूलिवंदन आणि शनिवारी रंगपंचमी, असे सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलेल्या सूचनांनुसार, होळी, धूलिवंदन उत्सवादरम्यान महिलांच्या अंगावर रंग, पाणी फेकणे, त्यांची छेडछाड, विनयभंग करणे, असे प्रकार घडण्याची शक्यता आहे. पादचारी, वाहनचालकांवर रंगाचे फुगे मारल्याने होणारे अपघात, मर्यादेपेक्षा आवाजात ध्वनिक्षेपकांचा अमर्याद वापर, गाण्यांच्या तालावर नृत्य, धार्मिक वाद, रंग उधळणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, होळीसाठी लाकडे चोरून नेणे, आदी कारणांमुळे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ३१ गुन्ह्यांची नोंद -
१) गेल्या वर्षी होळी, धूलिवंदन, रंगपंचमी उत्सवादरम्यान शहरात १६ दखलपात्र आणि १५ अदखलपात्र, अशा एकूण ३१ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
२) विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून सण, उत्सवाचा वापर निवडणूक प्रचारासाठी केला जाण्याची शक्यता असल्याने योग्य ती खबरदारी, दक्षता घेण्याची सूचना फणसळकर यांनी केली आहे.
चौकाचौकांत साध्या वेशात पोलिस -
१) चौकाचौकांमध्ये साध्या वेशातील पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त नेमण्यात यावा.
२) इतर धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांसमोर, संमिश्र वस्ती असलेल्या क्षेत्रात रंग उडवणे, गुलाल उधळणे, पाण्याच्या रंगाचे फुगे मारणे, आक्षेपार्ह गाणी वाजविणे, घोषणा देणे यांबाबत विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे.
३) जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे व त्यावरून होणारे वाद यांमध्ये वेळीच हस्तक्षेप करून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
धार्मिक भावना दुखवू नका -
१) धार्मिक भावना दुखविण्यासारख्या चित्रफिती व ध्वनिफिती सादरीकरण किंवा प्रसारित होणार नाहीत, याची विशेष खबरदारी घ्यावी. सार्वजनिक किंवा मोठ्या स्वरूपाच्या होळ्या पेटविण्याचे ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून मारामारी, इतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
२) धूलिवंदन व रंगपंचमीच्या वेळी परंपरेने चालू आलेल्या प्रथेनुसार काही लोक भांगमिश्रित दूध प्राशन करतात. यादिवशी दूधभेसळीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे सतर्क राहा, असेही आवाहन फणसळकर यांनी केले आहे.