विवाहितेचे विवस्त्र फोटो काढणारा पोलीस शिपाई बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 01:33 AM2020-03-09T01:33:14+5:302020-03-09T01:33:32+5:30
मुंबई पोलीस दलात होता कार्यरत : खंडणीसाठी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
जमीर काझी
मुंबई : ‘सरक्षणाय खलनिग्रहणाय’ ही बिरुदावली असलेल्या पोलीस खात्यातील एका पोलीस नाईकाला विवाहित तरुणीचे नग्न फोटो काढून खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपावरून खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. संतोष महादेव नलावडे असे त्याचे नाव असून, गेल्या सात महिन्यांपासून तो निलंबित होता. विभागीय चौकशीत त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने, त्याला सेवेतून कायमस्वरूपी हटविण्यात आले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मरोळ येथील सशस्त्र दलात संलग्न असलेल्या नलावडेला बडतर्फीचे आदेश नुकतेच लागू करण्यात आले आहेत. त्याच्या या घृणास्पद कृत्याबाबत वडाळा पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. ड्युटीवर कार्यरत असलेल्या संतोष नलावडेने गेल्या वर्षी एका विवाहित तरुणीला आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते.
गेल्या वर्षी ५ मार्चला तिला सोबत घेऊन कल्याणला गेला. तेथील एका लॉजवर दोन दिवस तिला ठेवले. मोहात अडकवून तिचे मोबाइलवर अश्लील फोटो काढले. त्यानंतर, पुन्हा मुंबईला परतल्यानंतर तो तिला ब्लॅकमेल करत होता. इतकेच नव्हे, तर तिचे नग्न फोटो विवाहितेच्या आईलाही दाखवून पैशांची मागणी केली. रक्कम न दिल्यास हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत राहिला. काही दिवस मायलेकींनी त्याचे म्हणणे मान्य करून मागणीची पूर्तता केली.
मात्र, त्याचा त्रास वाढत राहिल्यानंतर त्यांनी त्याबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्याची शाहनिशा करून वडाळा टी टी पोलिसांनी गेल्या वर्षी ५ जूनला नलावडेविरुद्ध विनयभंग, खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६७(अ) अन्वये गुन्हा दाखल करून अटक करून, त्यानंतर खात्यातून निलंबितही केले होते. या प्रकरणाची चौकशी सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकरवी सुरू होती. चौकशीत नलावडेने आपल्या वर्दीचा गैरवापर करून खात्याला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. त्याचे हे घृणास्पद कृत्य खात्याची शिस्त व प्रतिमा बिघडविणारे आणि महाराष्टÑ नागरीसेवा अधिनियम आणि भारतीय संविधान अनुच्छेद ३११ (२) बी अन्वये उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा निर्णय सहआयुक्त दर्जाच्या अधिकाºयांनी घेतला. त्यानुसार, आठवड्याभरापूर्वी त्यासंबंधीचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले.
शिक्षेविरुद्ध पोलीस मुख्यालयात अपिलाची संधी
मुंबई पोलीस दलातील मरोळ येथील सशस्त्र दलात नियुक्तीला असलेल्या संतोष नलावडे याच्याविरुद्ध अटकेची कारवाई झाल्यानंतर चौकशीला अधीन ठेवून त्याला खात्यातून निलंबित करण्यात आले. त्यासाठी असलेल्या तरतुदीनुसार त्याला वेतन दिले जात होते. चौकशीत त्याच्याविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने त्याला बडतर्फ केले. त्यामुळे त्याला आता सर्व वेतन, भत्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, या आदेशाविरुद्ध त्याला पोलीस महासंचालक कार्यालय आणि त्यानंतर गृहविभागात दाद मागता येऊ शकते.