कॅन्सरशी लढणाऱ्या कॉन्स्टेबलनं रोखली 'बर्निग टॉवर' घटना; १७ व्या मजल्यापर्यंत धावत गेले, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:04 PM2022-02-14T12:04:25+5:302022-02-14T12:05:21+5:30
ओशिवरा येथे बेहराम बाग परिसरात खान इस्टेट हा सतरा मजल्याचा टॉवर आहे. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी संध्याकाळी आग लागल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला.
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: कॅन्सरशी लढा देणारे ओशिवरा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संदीप डावरे (४५) यांनी १७ मजली टॉवरच्या टेरेसवर लागलेल्या आगी नंतर स्वतः टेरेसपर्यंत जात रहिवाशांना बाहेर काढले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे अग्निशमन दलाला वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवता आले आणि 'बर्निग टॉवर' ची घडता घडता राहिली.
ओशिवरा येथे बेहराम बाग परिसरात खान इस्टेट हा सतरा मजल्याचा टॉवर आहे. त्याठिकाणी ८ फेब्रुवारी, २०२२ रोजी संध्याकाळी आग लागल्याचा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला आला. त्यानुसार ओशिवरा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी ३ क्रमांकाच्या मोबाईल व्हॅनला सव्वा सातच्या सुमारास याबाबत कळवले. मात्र वाहतूक कोंडीमुळे ती गाडी घटनास्थळी पोहोचायला कमीतकमी २५ मिनिटे तरी लागली असती. त्याच वेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांच्यासोबत गस्तीवर असलेल्या डावरे यांना याची माहिती मिळाली आणि पुढच्या दोन मिनिटात ते दोघेही घटनास्थळी पोहोचले.
आगीच्या धुराचे लोट १३ व्या मजल्यापर्यंत येत असल्यानं तिथेच आग मजल्यावर लागल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे होते. तर काही जण सतराव्या मजल्याबाबत पोलिसांना सांगू लागले. कदम आणि डावरे यांनी इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर असलेल्या जमावाला आधी शांत केले आणि त्याठिकाणीअसलेल्या खासगी गाड्या तिथून हटविण्याची विनंती केली. अदानी वीज कंपनीला देखील कळवून वीजपुरवठा बंद करण्यात आला त्यामुळे लिफ्ट बंद झाली. मात्र धुराच्या लोटामध्ये रहिवासी अडकून बसले होते. तेव्हा जीवाची पर्वा न करता डावरे हे सुरक्षारक्षकाला घेऊन तडक इमारतीत शिरले आणि पायी सतराव्या मजल्यापर्यंत जात त्यांनी राहिवाशांना बाहेर पडण्यास सांगत दहा मिनिटात इमारत रिकामी केली.
तितक्यात अग्निशमन दल त्याठिकाणी आले. पार्किंग करण्यात आलेल्या गाड्या हटवण्यात आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने आग लागलेल्या टेरेस परिसरात पोहोचता आले आणि तिथुन अख्ख्या टॉवरला गिळंकृत करण्याच्या मनसुब्यात असलेल्या आगीवर त्यांनी तिथेच नियंत्रण मिळवले. यात बी विंगचे सुरक्षारक्षक मोहम्मद खान (४८) के होरपळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्तव्यासाठीच 'जीवन' मिळलेय
'डावरेंवर दोन वेळा कॅन्सरची शस्त्रक्रिया आणि ५० हुन अधीक केमोथेरपी करण्यात अद्याप करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सतरा माळे चढताना भीती वाटली नाही का? असे विचारल्यावर पोलीस खात्यात कर्तव्य निभावण्यासाठी आलोय. इतके प्रसंग ओढवूनही जीवन मिळाले ते त्यासाठी खर्च करण्याची इच्छा आहे असे उत्तर त्यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.