Join us  

जिम ट्रेनरच्या अटकेसाठी पोलीस बनले प्रोटीन्स विक्रेते

By गौरी टेंबकर | Published: October 14, 2022 3:52 PM

व्हिसाच्या नावाखाली तरुणीची फसवणुक करणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: व्हिसाच्या नावाखाली तरुणीची फसवणुक करणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला  समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. किरण मांडवकर असे त्याचे नाव असुन न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रोटीन्स विक्रेते असे वेषांतर केले होते.  पिडीत तरुणी ही कांदिवली परिसरात राहते. वजन कमी करण्यासाठी तिला एका पर्सनल ट्रेनरची गरज होती. दोन वर्षांपूर्वी तिची ओळख किरणशी ओळख झाली. त्याच दरम्यान तिने आपल्याला कॅनडा येथे जायचे असल्याचे किरणला सांगितले. तेव्हा किरण ने आपली ओळख असल्याचे सांगून तिच्याकडून २० लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर किरण हा व्हिसा न देताच पळून गेला. 

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने समता नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण विरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र शिदे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरिक्षक भगत, पोलीस हवाल दार कोलासो  व पथकातील पोलिसांनी ताबडतोब याप्रकरणी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना किरणची माहिती मिळाली. त्यानुसार  पोलीसांनी वेषांतर करून जिमचे प्रोटीन्स विकणारे असल्याचे भासवून पुणे येथून शिताफीने अटक केली. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे नोंद असून याप्रकरणी तो तीन महीने कारागृहात शिक्षा भोगून आला आहे. त्याने अशा प्रकारे अजून कोणाची फसवणूक केली आहे अथवा तो स्टिओराईड्स विकायचा का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारी