- मनीषा म्हात्रे
मुंबई : लाखोंचा चेक बाऊन्स करून दिल्लीत पळालेल्या ठगाच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी दिल्ली गाठली. दमछाक करत ठगाला बेड्या ठोकल्या. न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यातही घेतले. ठग ताब्यात आल्याच्या माहितीने वरिष्ठांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. तपास पथकही त्याला मुंबईकडे घेऊन आनंदाने निघाले. मात्र, दिल्लीतील गल्लोगल्लीची माहिती असलेला हा ठग पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. ठग आणि त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या सुरू असलेल्या धावपळीमुळे हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे दिल्लीत जणू दोघांमध्ये धरपकडीचा खेळ रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. १२ दिवस दिल्लीत तळ ठोकूनही ठग हाती न लागल्याने अखेर निराश होत तपास पथक सोमवारी मुंबईत दाखल झाले. त्यामुळे आता तपास पथकच चौकशीच्या घेºयात अडकण्याची चिन्हे आहेत.व्यवसायाच्या नावाखाली या ठगाने मुलुंडमधील काही नागरिकांकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर हे पैसे परत करण्याच्या नावे त्यांना चेक दिले. मात्र ते बाऊन्स झाले. या घटनेनंतर ठग पळून गेला. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी थेट मुलुंड न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीन पात्र वॉरंट काढले. त्याला हजर करण्याचे आदेश मुलुंड पोलिसांना दिले. ठग दिल्लीत पळाल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. त्यानुसार, मुलुंड पोलीस ठाण्याचे पीएसआय बाबर यांनी दोन अंमलदारांसह दिल्ली गाठली. दिल्लीतील कानाकोपरा पिंजून काढत २८ नोव्हेंबर रोजी ठगाला ताब्यात घेतले. त्याला घेऊन तपास पथक मुंबईकडे येण्यास निघाले.याच दरम्यान हातावर तुरी देत ठग पसार झाला. पोलिसांनीही त्याच्यामागे धाव घेतली. मात्र तो पोलिसांच्या हाती लागला नाही. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. ठगाच्या शोधासाठी १२ दिवस तपास पथक तेथे दबा धरून होते. मात्र ठग त्यांच्या हाती लागला नाही. अखेर सोमवारी पथक रिकाम्या हाती परतले.माहिती देण्यास नकार : आता वरिष्ठांकडून तपास पथकाचीच चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी याबाबत कमालीची गुप्तता पाळलेली पाहावयास मिळाली.