राजभवन परिसराला पोलिसांचे कडे

By admin | Published: August 19, 2015 02:29 AM2015-08-19T02:29:05+5:302015-08-19T02:29:05+5:30

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून राजकीय, साहित्य व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या वादामुळे उद्या (बुधवारी) होणाऱ्या पुरस्कार वितरण

Police custody to Raj Bhavan area | राजभवन परिसराला पोलिसांचे कडे

राजभवन परिसराला पोलिसांचे कडे

Next

मुंबई : बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून राजकीय, साहित्य व सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या वादामुळे उद्या (बुधवारी) होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. संपूर्ण राजभवन परिसरात पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण साधारणपणे माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात करण्यात येते. मात्र पुरंदरे यांना पुरस्कार देण्यावरून राजकीय, सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा कार्यक्रम राजभवनावर घेण्यात आला आहे. पुरस्कार रद्द करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. उद्या सकाळी त्यावर सुनावणी होईल. तो निर्णय आल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठरावीक व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे.
पोलिसांनी मंगळवारी या संपूर्ण परिसराची पाहणी केली. उद्याच्या सोहळ्यावेळी साध्या वेषातील पोलीसही मोठ्या प्रमाणावर तैनात असतील. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त प्रताप दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. कार्यक्रमात निमंत्रण व ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही़ या परिसरात संशयास्पदरीत्या आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सहआयुक्त (कायदा व
सुव्यस्था) देवेन भारती यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police custody to Raj Bhavan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.