मुंबई : दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेला राजकीय नेत्यांचे वादग्रस्त विधाने कारणीभूत असल्याचे आरोप होत असताना महाराष्ट्रात सुद्धा राजकीय नेत्यांच्या सभांना परवानगी देताना पोलीस सावध भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भिवंडीत होणाऱ्या आजच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.
सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात ओवेसी हे देशभरात विविध भागात सभा घेत आहे. त्याप्रमाणे आज संध्याकाळी ६ वाजता भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियमवर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी एमआयएमचे भिवंडी शहर अध्यक्ष मोहम्मद खालीद यांनी भाईवाडा पोलीस ठाण्यात सभेच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.
मात्र भाईवाडा पोलिसांनीअसदुद्दीन ओवेसी यांच्या सभेची परवानगी नाकारली आहे. सध्याची परिस्थती पाहता ही सभा पुढे ढकलण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी त्यांना पाठवले आहे. त्यामुळे ओवेसी यांची भिवंडीत होणारी सभा रद्द झाली असून, मार्चच्या दुसर्या आठवड्यात ही सभा घेतली जाणार असल्याचे एमआयएमच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे.