मृताच्या नातेवाइकांची पोलिसांवर दगडफेक; १३ पोलीस जखमी, १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:27 AM2018-07-23T05:27:14+5:302018-07-23T05:28:46+5:30
पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाइकांनी त्याचा फोटो घेण्यासाठी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मत्यू झालेल्या सचिन जैसवार (१७) या तरुणाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर घेराव घातला. पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत नातेवाइकांनी त्याचा फोटो घेण्यासाठी रुग्णालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखल्याच्या रागात जमावाने पोलिसांवरच हल्ला चढविला. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात ५ पोलीस वाहनांचे नुकसान झाले, तर १३ पोलीस जखमी झाले आहेत. या प्रकरणी सायन पोलिसांनी १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धारावी येथील रहिवासी असलेल्या सचिन जैसवार या तरुणाचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर जमावाने सायन रुग्णालयाबाहेर गर्दी केली. या वेळी जैसवारच्या कुटुंबीयांनी मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आहेत, त्याचे फोटो काढण्यासाठी आतमध्ये सोडा, अशी मागणी केली. मात्र, पोलिसांनी जमावाला थांबविले. पावणेअकराच्या सुमारास याच रागात जमावाने पोलिसांनाच मारहाण सुरू केली. त्यापैकी काहींनी पेव्हर ब्लॉकने पोलिसांच्या गाड्या फोडल्या. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांकडून जमावावर आवर घालण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यापैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. तासभर हा गोंधळ सुरू होता.
यामध्ये सायन पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस शिपायांसह महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण १३ जण जखमी झाले. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशिराने सायन पोलिसांनी १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललिता गायकवाड यांनी दिली.
पोलीस म्हणतात, मारहाण केलीच नाही...
च्मोबाइल चोरीची तक्रार आल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतले. तेव्हा चौकशीत सचिनही त्याच्यासोबत असल्याचे समोर आले होते. म्हणून फक्त चौकशीसाठी त्याला पोलीस ठाण्यात आणले. याबाबत त्याच्या भावालाही कळविले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला मारहाण करण्याचा संबंधच नाही. त्यात तक्रारदारासमोर दोघांना उभे केले. तेव्हा त्याने त्यांना ओळखले नाही. म्हणून दोघांनाही सोडून देण्यात आले. त्याला मारहाण केली नाही. तसेच त्याला आजाराची लक्षणे समोर आलेली आहेतच. त्यात त्याला मारहाण केली असती तर वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले असते. मात्र त्यातही त्याच्या अंगावर खुणा नाही आहेत, असे धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश पाटील यांनी सांगितले.
नातेवाईक काय म्हणतात...
जैसवार याचा भाऊ सुनील याने केलेल्या आरोपानुसार, १३ जुलैच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास धारावी पोलिसांनी सचिनला पोलीस ठाण्यात नेले. मीही सोबत होतो. त्याला रात्रभर मारहाण केली. त्याला सकाळी सोडतो, असे सांगून मला ३ वाजता घरी धाडले. सकाळी ८ वाजता गेलो तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता. मी त्याला काही तरी जेवायला द्या, असे सांगितले. मात्र पोलिसांनी दिले नाही आणि रात्री १० च्या सुमारास त्याला आणले. तेव्हा, पोलिसांनी खूप मारले. मला त्रास होतोय. रुग्णालयात न्या, असे सचिनने सांगितले.
तेव्हा खासगी डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार
केले. १५ तारखेला त्याची प्रकृती जास्त
बिघडल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल केले. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला आहे.
रुग्णालयाला
छावणीचे स्वरूप
सायन रुग्णालयाबाहेरील दगडफेक प्रकरणानंतर रात्रीपासून या ठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नातेवाइकांचीही योग्य ओळख पटल्याशिवाय त्यांना आत सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे अन्य नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ निर्माण केला होता.
लेप्टोचे निदान
सचिनच्या वैद्यकीय चाचणीत त्याला लेप्टो झाल्याचे निदान झाले होते. त्यातूनच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.