तिन्ही आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 06:28 AM2019-05-30T06:28:55+5:302019-05-30T06:29:10+5:30

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी बुधवारी विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपी डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Police detained all three accused in police custody | तिन्ही आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

तिन्ही आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी

Next

मुंबई : नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी बुधवारी विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपी डॉक्टरांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल अशी आरोपींची नावे आहेत. मृत तरुणीने (पायल तडवी) सुसाईड नोट लिहिली आहे का? आणि ती लिहिली असेल, तर या तिन्ही आरोपींनी ती नष्ट केली की लपवून ठेवली? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी आरोपी डॉक्टरांच्या ताब्याची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी विशेष न्यायालयाचे न्या. आर. ए. सदरानी यांच्यापुढे केला. पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत विशेष न्यायालयाने या तिघींनाही ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. मात्र, या तिघींनी पीडितेबरोबर व्हॉट्सअ‍ॅपवरून काही चॅट केले का? हे तपासण्यासाठी आणखी वेळ हवा, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
डॉ. पायल तडवीच्या शरीरावर काही जखमा असल्याचे, तडवीचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ‘पीडितेच्या शरीरावर जखमा आहेत. तिची हत्या करण्यात आली असू शकते. त्यामुळे आरोपींना भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदवावा,’ अशी मागणी सातपुते यांनी न्यायालयात केली. त्यावर तपास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल आल्यावरच स्पष्टता येईल, असे म्हटले.
मात्र, बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पायल तडवीने आत्महत्या केली, त्यावेळी तिची खोली आतून बंद होती. त्यामुळे तिची हत्या झाली असावी, अशी शंका घेण्यास वाव नाही.
आरोपींनी पीडितेची छळवणूक करून तिच्यावर जातिवाचक टिप्पणी केल्याने छळाला कंटाळून पीडितेने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमधील तिच्या रूमवर आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आरोपींवर पायलला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
‘तक्रार करायला हवी होती’
‘एखाद्याने स्वत:ला नुकसान करून घ्यावे, असा हेतू ठेवून एखादे कृत्य केले तर त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविता येईल. या केसमध्ये आरोपींना पीडितेची जातच माहीत नाही. त्या केवळ तिला चिडवित होत्या. तिने स्वत:ला नुकसान पोहोचवावे, असा हेतू त्यामागे नव्हता,’ असा युक्तिवाद बचावपक्षाचे वकील आबाद पौडा यांनी न्यायालयात केला. पीडितेला याचा त्रास होत होता, तर तिने नोकरी सोडायला हवी होती, तसेच तिने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करायला हवी होती. मात्र, तिने तसे काही केले नाही, ही बाब पौडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.
पायलची जात माहीत नव्हती
व्हॉट्सअ‍ॅपवर करण्यात आलेल्या चॅटचा हवाला देत पौडा यांनी न्यायालयाला सांगितले की, ती कोणत्या जातीची आहे, हे कोणालाही माहीत नाही. पोलीस केवळ आईने केलेल्या तक्रारीवरून आरोप करत आहेत. आईने वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत कुठेही या आरोपींविषयी काहीही म्हटलेले नाही.
कौटुंबिक वादही होते?
आणखी एक बचावपक्षाचे वकील संदीप बाली यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडितेने एका डॉक्टरबरोबर विवाह केला आहे. त्याच्याबरोबर राहण्याऐवजी पीडिता हॉस्टेलमध्ये राहात होती. कदाचित, त्यांच्या कुटुंबातील वादही तिच्या आत्महत्येस कारणीभूत असतील. तडवीने ज्या रूममध्ये गळफास घेतला, तो रूम आतून लॉक होता. आरोपींना त्या रूममध्ये जाण्यास परवानगी नव्हती. पोलिसांनीच तिच्या रूमचे दार तोडून आता प्रवेश केला आणि तिचे शव ताब्यात घेतले, असा युक्तिवाद बचावपक्षाच्या वकिलांनी केला.
आरोपींवरील गुन्हे
या घटनेनंतर आरोपी रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयात जबाब नोंदविण्यासाठी गेल्या. त्यासाठी त्यांना दोन ते तीन तास वाट पाहावी लागली,
असे आरोपींनी न्यायालयाला सांगितले. आरोपी डॉक्टरांवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, अँटी रॅगिंग
अ‍ॅक्ट व आयटी अ‍ॅक्ट या तिन्ही अ‍ॅक्टमधील काही तरतुदींअंतर्गत
गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याशिवाय भारतीय दंडसंहिता
कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त
करणे) अंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Police detained all three accused in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.