Join us

‘पोलीस दीदी’ उपक्रम; ताईमुळे चिमुरडीवरील अनर्थ टळला , आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:54 AM

लैंगिक अत्याचारासाठी साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचे शेजारच्या तरुणाने अपहरण केले. मात्र दहा वर्षांच्या ताईकडून मिळालेल्या लैंगिक शिक्षणामुळे चिमुरडीवरील अनर्थ टळल्याची घटना

मुंबई : लैंगिक अत्याचारासाठी साडे तीन वर्षांच्या चिमुरडीचे शेजारच्या तरुणाने अपहरण केले. मात्र दहा वर्षांच्या ताईकडून मिळालेल्या लैंगिक शिक्षणामुळे चिमुरडीवरील अनर्थ टळल्याची घटना वडाळा टी.टी.मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी अवघ्या पाच तासांतच पोलिसांनी आरोपी नितीन तांबडकरला (२५) बेड्या ठोकत मुलीला ताब्यात घेतले.वडाळा टी.टी. परिसरात सोनू (नावात बदल) आई-वडील आणि बहिणीसोबत राहते. रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास खेळत असलेली सोनू अचानक गायब झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र तिचा थांगपत्ता न लागल्याने आईने तासाभराने वडाळा टी.टी. पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांच्यासह २५ ते ३० जणांचे पथक तिच्या शोधासाठी कामाला लागले. शेजारी राहत असलेला नितीन सोनूला चॉकलेट देण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने परिसरातील प्रत्येक घर, इमारतीचा परिसर, गच्ची तसेच झाडाझुडपात शोध घेतला. रात्री साडे बाराच्या सुमारास वडाळा डेपो परिसरात सोनू नितीनसोबत आढळली. पोलिसांनी तिची सुटका करत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.चौकशीत नितीनने लैंगिक अत्याचारासाठी सोनूचे अपहरण केले. सोनूने दिलेल्या माहितीनुसार, नितीनने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरात ओरडल्यामुळे भीतीने नितीनने काही केले नसल्याचे तिने सांगितले. नितीनला अपहरण, पॉक्सोअंतर्गत अटक करण्यात आली.

टॅग्स :मुंबई पोलीसगुन्हाबलात्कार