Join us

पोलिसांकडे बंदूक नसते?

By admin | Published: September 09, 2016 3:44 AM

काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून आर्मी, सीआरपीएफ जवानांच्या हाती केवळ बंदुकाच दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांत पोलिसांच्या हाती

मुंबई : ‘काश्मीरमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून आर्मी, सीआरपीएफ जवानांच्या हाती केवळ बंदुकाच दिसतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांत पोलिसांच्या हाती लाठी पाहून आश्चर्य वाटते’, अशा शब्दांत काश्मिरी तरूणांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.शिक्षणासाठी पुण्यातील सरहद महाविद्यालयांत आलेल्या काही काश्मिरी तरूणांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. यावेळी काश्मीरच्या बडगाममध्ये राहणारा झाहीद भट म्हणाला की, पुण्यात शिक्षणासाठी सुमारे २५० विद्यार्थ्यांनी काश्मीर सोडले. मात्र आजही महिनाभर सुट्टी घेऊन हे विद्यार्थी काश्मीरला जातात. तिथे पोलिसांपासून दहशतवाद्यांच्या हाती बंदुका आणि सर्वसामान्य तरूणांच्या हाती दगड दिसत आहेत. मात्र ही परिस्थिती बदलायची असेल, तर ठोस उपाययोजना कराव्याच लागतील. बेरोजगारी हा तेथील प्रमुख मुद्दा असून, तरूणांना शिक्षण देऊन रोजगार उपलब्ध केल्यास नक्कीच काश्मीरमधील वातावरण निवळण्यास मदत होईल.जावेद अहमद हा इंग्रजी विषयात एमए करत आहे. तो सांगत होता की, काश्मीरची मूळ ओळखच दहशतवादी ठिकाण म्हणून केली जात आहे. ती बदलण्याची गरज आहे. देशातील सर्वाधिक पर्यटक काश्मीरमध्ये येतात. येथील पर्यटनस्थळांचा चाहता वर्ग संपूर्ण जगात आहे. मात्र इंटरनेटवर सर्च केल्यास काश्मीरचा चेहरा दहशतवादी म्हणून समोर येतो. त्यामुळे सरकारने ही ओळख बदळण्याची गरज आहे.काश्मीरमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. त्याहून गंभीर प्रश्न म्हणजे येथील काही प्रमाणात शिकलेल्या तरूणांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारने येथे उद्योग सुरू करून येथील तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. थंड हवेचे ठिकाण असल्याने औषध निर्माण करण्याचा उद्योग याठिकाणी सहज शक्य असल्याचे मतही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.नुसती चर्चा नको, ठोस कृती हवीपाकिस्तानसोबत सुरू असलेल्या चर्चेपेक्षा ठोस कृती सरकारने करावी, असा सूर या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. वरवर चर्चा करत असताना सीमेवर गोळीबार होत असेल, तर चर्चा थांबवावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांची होती. जोपर्यंत गोळीबार आणि भ्याड हल्ले थांबत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा सरकारने करू नये, असे आवाहनही या विद्यार्थ्यांनी केले आहे.जागो भारत अभियान : काश्मीरमधील लोकांनाही शांतताच हवी असल्याचे झाहीद भट म्हणाला. तो सांगत होता की, काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती बदलण्याचा निश्चय येथे शिक्षण घेणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यासाठीच पुण्यासह देशातील विविध भागांत शिकणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना एकत्र आणून बदल करण्याचा मानस आहे. जागो भारत या अभियानामार्फत काश्मीरमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही झाहीदने सांगितले.२४ तासांत एक दहशतवादी तयार होतोकाश्मीरमध्ये तरूणांना २४ तासांत बंदुक उपलब्ध केली जात असल्याचा धक्कादायक आरोप जावेद अहमद याने व्यक्त केला. तो म्हणाला की, फुटीरतावाद्यांना रोखण्यासाठी सरकार तेथील सैन्यांची संख्या वाढवत आहे. मात्र हा त्यावरील उपाय नाही. मुळात काश्मीरमध्ये बंदुक तयार करण्याचा कारखाना नाही. मग या बंदुका सहज उपलब्ध होतातच कश्या? याचा शोध सरकारी यंत्रणेने घेण्याची गरज आहे. जर सीमेवरील त्रुटी दूर करून हत्यारांची तस्करी रोखली, तर आपोआपच दहशतवाद्यांची संख्याही कमी होईल, असा विश्वास अहमदने व्यक्त केला.