कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नव वर्षाचे उत्साहात स्वागत करणाऱ्या मुंबईकरांना कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मुंबईत ५ जानेवारीपर्यंत नाईट संचारबंदी लागू केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी खांद्यावर असलेले ३५ हजार मुंबई पोलीसही यंदा विशेष खबरदारी म्हणून रस्त्यावर उतरणार आहेत. तसेच थर्टी फर्स्टची पार्टी इमारतीच्या गच्चीवर करण्यास परवानगी नसून त्यावर मुंबई पोलीस ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. “नव वर्षाच्या पूर्वसंध्येला अप्रिय घटना घडू नये, तसेच कोरोनाबाबत नियमांचे काटेकोटरपणे पालन नागरिकांकडून करण्यात यावे यासाठी मुंबई पोलिसांना सज्ज करण्यात आले असल्याचे कायदा व सुव्यस्थेचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.
संचारबंदीच्या निर्बंधामुळे हॉटेल, पब रात्री ११ वाजता बंद करावे लागतील. या नियमांचे पालन न करणाऱ्या मालकांवर तसेच कोणीही आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे पुढे नांगरे पाटील म्हणाले आहेत. संचारबंदीचे इतर निर्बंध असले तरी मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. मात्र, छोटया गटाने, पाचपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत, असे नांगरे पाटील म्हणाले आहेत.
गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही
बोटीवर तसेच गच्चीवर पार्ट्यांना परवानगी नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास आयोजकांवर आणि गर्दीवर कारवाई करण्यात येईल असे नांगरे पाटील यांनी सांगितले. महिला छेडछाडीच्या, त्रास देण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी विविध ठिकाणी विशेष पथक तैनात असणार आहे. घातपाताचा धोका टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात वाहतूक पोलीस दरवर्षीप्रमाणे मोहिम राबवणार आहे.