Join us

सरावावेळी गोळी लागून तीन महिलांसह चौघे पोलीस गंभीर, शस्त्र हाताळणीसाठी उजळणीविना पाठविले होते सरावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 12:06 AM

गोळीबाराचा सराव करीत असताना गोळी लागून मुंबई पोलीस दलातील तिघा महिला कॉन्स्टेबलसह चौघे जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आलिबाग येथील पुरंदरपाड्यातील गोळीबार मैदानावर घडली.

- जमीर काझीमुंबई : गोळीबाराचा सराव करीत असताना गोळी लागून मुंबई पोलीस दलातील तिघा महिला कॉन्स्टेबलसह चौघे जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आलिबाग येथील पुरंदरपाड्यातील गोळीबार मैदानावर घडली. नीलम थोरवे (वय २५, रा. कर्जत), सुरेखा बावधने (२३, रा. नायगाव, दादर), स्वप्नाली आमटे (२३, रा. घाटकोपर) व रवींद्र मदने (४४, रा. खांदा कॉलनी, पनवेल) अशी त्यांची नावे असून, सर्वांवर नवी मुंबईतील पनवेल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.एक महिला पोलीस ‘७.६२ एसएलआर’पकडत असताना त्यातून गोळी उडून तिच्यासह चौघे जण जखमी झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सर्वांना शस्त्र हाताळणीबाबत उजळणी करणे आवश्यक असताना त्याच्याविना त्यांना थेट गोळीबार सरावाला पाठविण्यात आले होते. त्याचप्रमाणे मुंबईतील चार सशस्त्र दलाच्या (एल ए) मुख्यालयात गोळीबार करण्यासाठी ‘रेंज’उपलब्ध असताना त्यांना आलिबागला का पाठविले, ही बाब अनाकलनीय ठरली आहे. काही अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे घडलेली ही घटना मुंबई पोलीस दलात चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यास मात्र ‘एल ए’च्या नियंत्रण कक्षातून टाळाटाळ करण्यात आली. ड्युटीवरील उपनिरीक्षक बंधे यांनी तर असा प्रकार घडल्याबाबत नोंदच नसल्याचे सांगितले.गेल्या ३० जानेवारीपासून मुंबई पोलीस दलात विविध पोलीस ठाणे, विभाग, शाखेत कार्यरत असलेल्या ४५ वर्षांखालील अंमलदारांना शस्त्र हाताळणी उजळणी व गोळीबार सराव व्हावा, यासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी रोज चारही विभागातर्गंत संबंधित पोलिसांची ट्रेनिंगला पाठविले जाते. त्यामध्ये पहिल्या दिवशी पोलिसांना शस्त्र हाताळणीबाबत उजळणी द्यावी, त्यानंतर दुस-यादिवशी त्यांना प्रत्यक्ष गोळीबाराच्या सरावासाठी पाठवावे, असे लेखी आदेश सहआयुक्त (प्रशासन) अर्चना त्यागी यांनी दिले आहेत. तरीही नायगाव येथील एका निरीक्षकाने महिला पोलिसांना हाताळणी उजळणीविना थेट आलिबागला सरावासाठी पाठविले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडली.